अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी तिरोडा पोलिसांचा पुढाकार

विद्यार्थ्यांचे पथनाट्य; संशयित ठिकाणी श्वान पथकाच्या मदतीने शोधमोहीम
जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे
तिरोडा : अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तिरोडा पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिरोडा येथील बसस्थानक तसेच ‘तिरोडाचा राजा’ गणेश मंडळ, गंज मार्केट परिसरात मेरिटोरिअस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. अमली पदार्थांपासून दूर राहणे, व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करणे आणि तरुणांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीत सक्रिय सहभाग घेणे, असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी सादर करण्यात आलेल्या या पथनाट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, २२ सप्टेंबर २०२६ रोजी तिरोडा पोलिसांनी पोलीस श्वानाच्या मदतीने शहरातील संशयित व्यक्तींच्या घरांमध्ये तसेच पानटपऱ्यांच्या परिसरात अमली पदार्थांच्या अनुषंगाने शोधमोहीम राबविली. अमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा सेवनाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य देण्यात येत आहे.
अमली पदार्थांचे सेवन ही केवळ कायद्याची बाब नसून त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होत असल्याने नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देऊन व्यसनमुक्त समाजनिर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.ही जनजागृती मोहीम आणि शोधमोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलपत्रेवार, पोलीस हवालदार चव्हाळे, पोलीस हवालदार अमित गायकवाड, पोलीस हवालदार पेशणे आणि पोलीस हवालदार घुगे यांनी राबविली. अमली पदार्थांविरोधातील कारवाईसोबतच जनजागृतीच्या माध्यमातून तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला.









