राजुऱ्यात पहिली संविधान शाखा व शाहू महाराज जयंती संपन्न

गुणवंताचा ही झाला सत्कार .
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून पहिली संविधान शाखा आयोजित करण्यात आली. या सभेत चंद्रपूर येथील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संयोजक बळीराज धोटे तसेच भास्कर सपाट, अशोक मस्के आणि पी. एम. जाधव हे उपस्थित होते. संविधान शाखेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. संविधानातील उद्देश पत्रिकेतील धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर विस्तारित मार्गदर्शन करण्यात आले. संविधान जागृतीची गरज आणि आजच्या परिस्थितीतील वास्तव याबाबत संविधान शाखेत माहिती देण्यात आली. बळीराज धोटे यांनी संविधानातील मूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित होऊन जागृत राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, रोजगार व महागाई या मुद्द्यावर चर्चा करून ते कसे मार्गी लावता येईल याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
रामपूर येथील मायनिंग सरदार पदी निवड झालेले अजय रोगे व फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये निवड झालेले सागर कोराटे या दोन गुणवंतांचा सत्कार शिवचरित्र हे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याने दिवा पेटविण्याचे प्रात्यक्षिक पी. एम. जाधव यांनी करून दाखविले. त्यांनी पाण्याने भरलेल्या दिव्यात हात चलाखी करून कॅल्शियम कार्बाईडचे खडे टाकले. त्याची पाण्याशी क्रिया होऊन ॲसिटीलीन नावाचा ज्वलनशील वायू तयार होतो आणि तो जळतो. कार्यक्रमाचे संचालन संभाजी साळवे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट उद्देशपत्रिकेचे वाचन व राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे, बळीराजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय मोरे, चांदागड फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक लक्ष्मण घुगुल, मधुकर मटाले, ॲड. मारोती कुरवटकर, अमोल राऊत, ॲड. संतोष कुळमेथे, प्रा. मधुकर रागीट, धिरज मेश्राम, दिलीप गिरसावळे, जगदीश पिंगे, श्रीकृष्ण वडस्कर, विनोद बोबडे, बापूराव मडावी, धर्मु नगराळे, अभिलाष परचाके, कैलास उराडे, आसिफ सय्यद, रामकीसन पारखी आदीं सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.