तुटलेल्या दुभाजकामुळे अपघाताचा धोका

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे
तिरोडा-तुमसर महामार्गावर बसस्थानका समोर धोकादायक स्थिती ; दहा दिवसांपासून नागरिकांचा जीव मुठीत
तिरोडा-तुमसर महामार्ग क्रमांक ७५३ वरील तिरोडा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मागील काही दिवसांपासून तुटलेले दुभाजक रस्त्यावरच पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी वाहनांची सतत वर्दळ असताना तुटलेल्या दुभाजकामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

तिरोडा-तुमसर महामार्ग क्रमांक ७५३ हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक, मालवाहतूक तसेच स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र तिरोडा येथील बसस्थानकाच्या गेटसमोर तुटलेले दुभाजक मागील सुमारे दहा दिवसांपासून रस्त्यावरच असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांसमोर अपघाताचे संकट उभे ठाकले आहे.दुभाजक तुटल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती अथवा हटविणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणेचे अद्याप लक्ष गेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः बसस्थानकाच्या परिसरात प्रवासी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अशा धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे गंभीर ठरू शकते.रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे नियम प्रशासनाकडे आहेत. वाहतूक नियंत्रण यंत्रणेकडून अशा वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, रस्त्याचाच काही भाग तुटलेल्या दुभाजकामुळे अडविला जात असेल, तर तो अडथळा दूर करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. नियमांची अंमलबजावणी करताना सामान्य नागरिकांप्रमाणेच सार्वजनिक रस्त्यांच्या सुरक्षिततेकडेही समान गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महामार्गावरील तुटलेले दुभाजक, खड्डे, अपूर्ण दुरुस्ती आणि वाहतुकीतील अन्य अडथळे याकडे संबंधित विभागाने नियमितपणे पाहणी करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासनानेही वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाची यंत्रणा सक्रिय व्हावी, अशी जनतेची अपेक्षा नाही. सामान्य नागरिकांचाही जीव तितकाच मौल्यवान आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तिरोडा येथील तुटलेले दुभाजक तातडीने हटवून किंवा दुरुस्त करून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









