पत्नीचा निवडणूक प्रचार करताना पती अमर नाडे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी गावकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अशातच, ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीच्या सरपंचपदाचा प्रचार करत असताना पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात घडली आहे.
अमर पुंडलिक नाडे (वय ४५ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरूड ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. गुरूवारी अमृता यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, प्रचाराची जाहीर सभा सुरू असताना अमर नाडे यांनी भाषण सुरू केले. मात्र, भाषण करत असताना अचानक ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अमर यांच्या अचानक निधनाने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.