खरीप 2026 पिक कापणी प्रयोगासाठी अधिकारी सज्ज; पंचायत समितीत मार्गदर्शन व प्रशिक्षण संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी
खरीप हंगाम 2026 मधील पिक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक आणि शास्त्रीय पद्धतीने पार पाडण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व उपकृषी अधिकारी यांच्यासाठी पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, कृषी अधिकारी सुधाकर फुलपगार, विस्तार अधिकारी (कृषी) संदीपान घुंबरे तसेच श्रीमती अश्विनी लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे आणि एस. बी. रेंगे यांनी पिक कापणी प्रयोगाचे महत्त्व, त्याची कार्यपद्धती, अचूक नमुना निवड, माहिती नोंदविण्याची प्रक्रिया तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (PPT) द्वारे प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आल्याने उपस्थित अधिकाऱ्यांना विषय समजून घेण्यास मोठी मदत झाली.
प्रशिक्षणात नियुक्त करण्यात आलेल्या ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांना पिक कापणी प्रयोग करताना कोणतीही हलगर्जीपणा न करता अत्यंत दक्षता, अचूकता आणि पारदर्शकता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिक उत्पादनाचे वास्तव चित्र शासनापर्यंत पोहोचण्यासाठी पिक कापणी प्रयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी बोबडे, मानोलीकर, विस्तार अधिकारी (कृषी) संदीपान घुंबरे तसेच श्रीमती अश्विनी लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.









