ताज्या घडामोडी

परभणी-हिंगोलीसाठी विशेष कृषी पुनर्वसन आराखडा मंजूर करा

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार सईद खान यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे अत्यल्प प्रमाण तसेच पावसातील दीर्घ खंडामुळे गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग यासह भाजीपाला आणि फळबागांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून अनेक भागांतील पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत.

या पार्श्वभूमीवर परभणी-हिंगोली जिल्ह्यांसाठी स्वतंत्र “विशेष कृषी पुनर्वसन आराखडा” मंजूर करून त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी परभणी हिंगोली विधान परिषद आमदार सईद खान यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
नांदेड येथे आज आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकी नंतर आमदार सईद खान यांनी कृषिमंत्र्यांना सविस्तर मागणीपत्र देत दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.यावेळी पाथरी विधानसभा प्रमुख बालाजी कुऱ्हाडे,मा जिल्हाप्रमुख नाना टाकळकर उपस्थित होते.
“शेतकऱ्यांना केवळ नुकसानभरपाई देऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृषी पुनर्वसनाची गरज आहे,” असे आमदार सईद खान यांनी म्हटले आहे.
या विशेष पुनर्वसन आराखड्यात पीक नुकसानीचे सर्वसमावेशक पंचनामे, विशेष आर्थिक मदत, पीक विम्याची आगाऊ नुकसानभरपाई, रब्बी हंगामासाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे-खते, उपलब्ध पाण्याचे शेतीसाठी नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठा, ठिबक व तुषार सिंचनासाठी विशेष अनुदान आणि पीक कर्ज पुनर्गठन यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची फी माफ करा
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक फी माफ करावी, अशी महत्त्वाची मागणीही आमदार सईद खान यांनी केली आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय तसेच व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना फी माफीसोबतच आवश्यक शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि वसतिगृह शुल्काबाबतही सवलत देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रब्बी हंगामासाठी विशेष मदतीची मागणी
खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकऱ्यांकडे आगामी रब्बी हंगामासाठी भांडवलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे, खते आणि आवश्यक कृषी निविष्ठा मोफत अथवा विशेष अनुदानावर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठित करून आगामी रब्बी हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांना निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पशुधन आणि शेतमजुरांसाठीही उपाययोजना
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन गरज असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.
दुसरीकडे, शेतीची कामे कमी झाल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे मनरेगा आणि इतर योजनांच्या माध्यमातून जलसंधारण, मृदसंधारण, शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे आणि जलपुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार खान यांनी केली आहे.
“पुनर्वसन आराखडा केवळ पीक नुकसानीपुरता मर्यादित नसावा”
परभणी-हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता विशेष कृषी पुनर्वसन आराखडा हा केवळ पीक नुकसानीच्या भरपाईपुरता मर्यादित न ठेवता शेतकरी कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन, विद्यार्थ्यांचे शिक्षण, पशुधन, पाणी, आगामी रब्बी हंगाम आणि दीर्घकालीन जलसंधारण या सर्व बाबींचा समावेश असलेला असावा.

दुष्काळ आढावा बैठकीत परभणी-हिंगोली जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विशेष कृषी पुनर्वसन आराखडा मंजूर करून त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याची अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार सईद खान यांनी केली आहे.

– सईद खान
आमदार,
परभणी हिंगोली विधान परिषद

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *