नेरीच्या युवकांनी घडवला इतिहास; पोळा सणाला अन्नदात्यांचा अनोखा सन्मान!

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोळ्याला सर्व शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान
गावकऱ्यांच्या सहभागातून पोळा उत्सवाला सामाजिक चळवळीचे स्वरूप; शेतकऱ्यांना सन्मानपत्र व विविध भेटवस्तूंची अनोखी भेट
नेरी: शेतकरी आणि त्याच्या जीवाभावाच्या साथीदार असलेल्या बैलांच्या कष्टाला सलाम करणारा पोळा सण यंदा नेरी गावात एका अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे ऐतिहासिक ठरला.

गावातील युवकांनी एकत्र येत ‘युवा ग्रामविकास संघटना, नेरी’ च्या माध्यमातून पोळा उत्सवाला केवळ पारंपरिक सण न ठेवता शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे स्वरूप दिले.
संपूर्ण वर्षभर ऊन, पाऊस, थंडी आणि अनेक अडचणींचा सामना करत संपूर्ण समाजासाठी अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ म्हणून गौरविण्याचा अभिनव उपक्रम यावेळी राबविण्यात आला. युवकांनी गावातील नागरिकांकडून स्वेच्छेने आर्थिक योगदान गोळा करून त्यातून शेतकऱ्यांसाठी विविध उपयोगी भेटवस्तूंची व्यवस्था केली.

यामध्ये सीलिंग फॅन, पाण्याचे कॅन, मोबाईल, ब्लूटूथ स्पीकर, टिफिन बॉक्स आदी भेटवस्तू देण्यात आल्या. मात्र या भेटवस्तूंपेक्षा शेतकऱ्यांच्या कष्टाला दिलेला ‘सन्मानपत्राचा मान’ हा उपक्रमाचा सर्वात भावनिक आणि लक्षवेधी भाग ठरला.
शेतकऱ्यांच्या हातून निर्माण होणाऱ्या अन्नाचे महत्त्व समाजाला जाणवावे आणि ‘अन्नदाता शेतकरी हा समाजाचा खरा आधारस्तंभ आहे’ हा संदेश पुढे जावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक शेतकरी भावूक झाले असून, युवकांनी केलेल्या या अनोख्या सन्मानाचे गावकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त कौतुक होत आहे.

“शेतकरी वर्षभर राबतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते. त्याच्या कष्टाचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे,” अशी भावना युवकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, पोळा सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या अन्ननिर्मितीतील योगदानाचा गौरव करण्याचा हा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात राबविण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. त्यामुळे नेरीच्या या उपक्रमाची चर्चा परिसरात होत आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्सवासाठी गावातील नागरिकांकडूनच योगदान घेऊन, गावकऱ्यांच्या सहभागातून संपूर्ण कार्यक्रम उभा करण्यात आला. त्यामुळे पोळा उत्सवाला एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि गावविकासाचा संदेश मिळाला.
गावातील युवकांनी आता “नेरीला भ्रष्टाचारमुक्त करून परिसरातील आदर्श गाव बनविण्याचा” संकल्प केला असून, त्यासाठी युवकांना गावातील अनुभवी, शिक्षित आणि समाजाभिमुख व्यक्तींचे मार्गदर्शन मिळत आहे. युवकांच्या या एकजुटीमुळे नेरीमध्ये उत्सवातून सामाजिक परिवर्तनाची नवी सुरुवात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परंपरा, शेतकऱ्यांचा सन्मान, ग्रामस्थांचा सहभाग आणि युवकांची सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा यंदाचा पोळा उत्सव नेरीच्या सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.









