ताज्या घडामोडी

पाथरीत आमदार सईद खान यांचा जंगी सत्कार

पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेज योजनेसाठी ₹३३५ कोटी मंजूर, विकासकामांचा दिला रोडमॅप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी


विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर प्रथमच पाथरीत आगमन झालेल्या आमदार सईद खान यांचा एकतानगर रोडवरील फंक्शन हॉलमध्ये जंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या आगमनावेळी ५ ते ६ जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी, तसेच क्रेनच्या साहाय्याने भव्य हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या सत्कार सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक एजाज खान आणि शिवसेना नेते मुजम्मील खान यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना प्रसिद्धीप्रमुख शेख खुर्शीद यांनी केले, तर प्रास्ताविक एजाज खान यांनी केले.

पाणीपुरवठा व ड्रेनेजसाठी ₹३३५ कोटी

सत्काराला उत्तर देताना आमदार सईद खान म्हणाले, “पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून पाणीपुरवठा आणि भूमिगत ड्रेनेज योजनेसाठी ₹३३५ कोटींची मंजुरी मिळाली आहे.”

या मंजुरीबद्दल त्यांनी शिवसेना पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

“जनतेच्या पैशांचा हिशोब जनतेला देणार”

विरोधकांवर निशाणा साधताना आमदार सईद खान म्हणाले, “जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे. आम्ही जनतेला विकासकामांचा हिशोब देणार आहोत. शहरातील प्रमुख ठिकाणी डिजिटल डिस्प्ले लावून विकासकामांचा पारदर्शक हिशोब नागरिकांसमोर मांडला जाईल. विकासकामांमध्ये खोडा घालू नका.”

पाथरीच्या विकासाचा रोडमॅप

यावेळी त्यांनी शहरात १,५०० नवीन लाईट्स, मुस्लिम समाजासाठी भव्य शादी खाना, हिंदू समाजासाठी व मागासवर्गीय समाजासाठी मंगल कार्यालये, तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून १,२०० दुकाने उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

“राजकीय विरोध असू द्या, व्यक्तिगत टीका नको”
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सईद खान म्हणाले, “आमचा विरोध राजकीय आहे; व्यक्तिगत नाही. कोणावरही वैयक्तिक टीका करू नका. सोशल मीडियावरही मर्यादा पाळा. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.”

शेवटी मिश्कील शैलीत “आयोजकांनी पुरेसा वेळ दिला, तर पाथरीला आणखी पुढे नेता येईल,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी नगराध्यक्ष आसेफ खान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेवक उद्धव नाईक, माजी नगरसेवक शेख इरफान, अमोल भाले यांनी आपल्या मनोगतात पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजक मुजम्मील खान यांनी, “आमदार सईद खान यांच्या नेतृत्वात पाथरीचा विकास वेगाने होईल आणि शहराचा चेहरामोहरा बदलेल,” असा विश्वास व्यक्त केला.

५ सप्टेंबर रोजी झालेल्या या सत्कार सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *