वटपौर्णिमेनिमित्त पाथरी शहर व तालुक्यात भक्तिमय वातावरण

सौभाग्यवतींकडून वटवृक्षाचे पूजन
प
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वटपौर्णिमेचा पवित्र सण पाथरी शहरासह तालुक्यात सोमवारी मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. शहरातील शिवाजीनगर परिसरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वटवृक्षाची विधिवत पूजा करून अखंड सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
शहरातील शिवाजीनगर परिसरात सकाळपासून महिलांची वटवृक्षाजवळ मोठी गर्दी झाली होती. महिलांनी वटवृक्षाला हळद-कुंकू, फुले, अक्षता अर्पण करून पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाभोवती पवित्र दोरा गुंडाळत वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण केले. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावत शुभेच्छा दिल्या तसेच पारंपरिक गीतांनी परिसर भक्तिमय झाला.
तालुक्यातील विविध गावांमध्येही वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी महिलांनी सामूहिक स्वरूपात वटवृक्षाचे पूजन करून भारतीय संस्कृतीतील परंपरांचे जतन केले. वटवृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जात असल्याने या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, माता सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले. त्या घटनेच्या स्मरणार्थ विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीची मनोभावे प्रार्थना करतात.
यावेळी महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख-शांती आणि समाजात ऐक्य, प्रेम व सद्भावना कायम राहावी, अशीही प्रार्थना केली. पाथरी शहरातील शिवाजीनगर परिसरातील वटवृक्षाजवळ दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी धार्मिक परंपरेचे जतन करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.









