धान पिके वाचविण्यासाठी तातडीने सिंचनाचे पाणी द्याजिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांची मागणी

धान पिके वाचविण्यासाठी तातडीने सिंचनाचे पाणी द्या
जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे
तिरोडा ; धापेवाडा उपसा सिंचन क्रमांक-१, तिरोडा अंतर्गत टप्पा क्रमांक-१ मधील कवलेवाडा, पुजारीटोला, मरारटोला, मांडवी, मुंडीपार, सोनाली, बिरोली, चांदोरी, भांबोडी, चिरेखणी यासह परिसरातील १२ ते १५ गावांतील धान पिके सध्या पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील उभे पीक वाचविण्यासाठी तातडीने सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य किरणकुमार अमृतलाल पारधी यांनी केली आहे.यासंदर्भात धापेवाडा उपसा सिंचन क्रमांक-१, तिरोडाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले असून, टप्पा क्रमांक-१ अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात संबंधित तिन्ही पंपांच्या मोटर, पंप तसेच विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोणतीही दिरंगाई न करता तिन्ही पंप पूर्ण क्षमतेने सुरू करून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि टप्पा क्रमांक-१ मधील सर्व संबंधित गावांतील धान पिकांना नियमित सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सध्या पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी धान पिके संकटात असून, ती वाचविण्यासाठी संबंधित अधिकारी व यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. तसेच तिन्ही पंपांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









