ताज्या घडामोडी

आदिवासी बांधवांवर अन्याय करणां-या “त्या “अधिकारी व कर्मचा-यांवर कार्यवाही करा- अन्यथा जागतिक महिला दिनी आंदोलन करु ! सिंघूताई जाधवंचा प्रशासनाला इशारा

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

कोलाम बांधवाचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात कोलाम बांधवाना शासन योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र अतिदुर्गम भाग म्हणून शासन दरबारी गणल्या गेलेल्या जिवती भागात दिसून येत असल्याचे सिंधूताई जाधव यांनी म्हटले आहे . कोलाम बांधवांना विकासापासून वंचित ठेवणां-या अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करून त्यांचेवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी जिवती तालुका शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी काल सोमवार दि.२८ फेब्रुवारीला एका लेखी निवेदनातुन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना केली असल्याचे त्यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले .
तालुक्यातील भुरीयेसापूर येथील कोलाम बांधव स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही मुलभूत सोयी-सुविंधापासून वंचित असल्याची खंत देखिल त्यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केली आहे. उपरोक्त क्षेत्रात घरकुलांचे कामे प्रलंबीत आहेत.इतकेच नाही तर शासनाने वनहक्क समितीच्या माध्यमातून जमिनीचे पट्टे दिले ,माञ लाभार्थ्यांना अद्याप सातबारा पुरविला नाही. या शिवाय अनेक गावात रोजगार हमीचे कामे सुरू नाही.तसेच पेसा अंतर्गत आलेल्या शासन निधीचा कोलाम बांधवांच्या विकास कामासाठी खर्ची घातला नसल्याचा स्पष्ट आरोप देखिल शिवसेना जिवती तालुका महिला संघटिका सिंधुताई जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.सातत्याने दुर्लक्षित असलेल्या भुरीयेसापूर येथील कोलाम बांधवांना नियमितपणे (स्वस्त दुकाणातुन) धान्य मिळत नाही ही एक शाेकांतिका आहे.काहींचे रेशन कार्ड स्वस्त धान्य दुकानदाराकडेच असून अनेकांची नावे अंतोदय याेजनेतून कमी केल्याचे बोलल्या जात आहे.या बाबत सिंधूताई जाधव यांनी जिवती तहसीलदारांना संबंधित भुरीयेसापूर येथील कोलाम बांधवांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी करून रेशन दुकानदारावर कार्यवाही करा अशी तक्रार कोलाम बांधवांच्या वतीने केली होती .परंतु यावर संबधित तहसीलदार व अन्न पुरवठा निरीक्षक यांनी कार्यवाही न करता त्या रेशन दुकानदाराची पाठराखन केली आहे .फक्त सदरहु रेशन दुकानदाराचे दुकाण दुस-या दुकाणास जोडून ते अधिकारी मोकळे झाले आहे.काही दिवस रेशन दुकान दुस-या दुकाणाला जोडायचे आणि नंतर परत त्या दुकानदारांना ते दुकाण चालवायला द्यायचे ही प्रथा वर्षांनुवर्षा पासून सुरु असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. दरम्यान शेणगाव येथील रेशन दुकानदारांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करून त्या दुकाणदारावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने नुकतीच केली आहे.

धनकदेवीत घरकुलांची कामे अपूरे !

शासकीय विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मागील दोन वर्षापासून कोलाम बांधवांना शासन योजनेतून मिळालेले घरकुले अजूनही अपुर्ण आहे.तर काही घरकुलांची कामे निकृष्ट पध्दतीने केल्याने पक्या घरात राहण्याचे त्यांचे (कोलाम बांधवाचे )स्वप्न अक्षरशा भंगले आहेत.त्या बांधवाना तेंदूपत्ता बोनसही दोन वर्षापासून मिळालेला नाही. याच परिसरातील वनहक्क समितीच्या माध्यमातून २७ वनदावे दाखल केले आहे .अद्यापही त्यांना जमिनीचे पट्टे दिल्या गेले नाही.त्याच प्रमाणे खडकी रायपुरमध्ये सुध्दा घरकुलाची कामे अपुर्ण अवस्थेत आहेत.वरील संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी .व आदिवासी बांधवांना याेग्य न्याय द्यावा ,अन्यथा विश्व महिला दिनी संपूर्ण कोलाम बांधवांना साेबत घेवून जिवती तहसिल कार्यालय समाेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सिंधूताई जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला एका निवेदनातुन दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close