ताज्या घडामोडी

26 वर्षांच्या गौरवशाली लष्करी सेवेनंतर विजयकुमार पारधी मायभूमीत परतले

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

तिरोडा : भारतीय सैन्यात तब्बल 26 वर्षे अविरत राष्ट्रसेवा बजावत कर्तव्याचे निष्ठेने पालन करणारे श्री. विजयकुमार सेवकरामजी पारधी सेवानिवृत्तीनंतर आपल्या मायभूमी तिरोडा येथे परतले. दीर्घकाळ देशसेवा करून मायभूमीत परतलेल्या विजयकुमार पारधी यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, परिचित तसेच माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात जंगी स्वागत केले.विजयकुमार पारधी यांनी 30 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे भारतीय सैन्यातील 26 वर्षांचा गौरवशाली सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी त्यांचे तिरोडा रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच पत्नी, मुले, आई-वडील, मोठे बंधू-भावजय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचित मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थित झाले.


रेल्वे स्थानकावर आगमन होताच कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी करण्यात आलेल्या जयघोषामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला. तब्बल 26 वर्षे देशसेवा करून आपल्या माणसांमध्ये परतलेल्या विजयकुमार पारधी यांच्या स्वागतावेळी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि भावुकतेचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.यानंतर बँडबाजा आणि आतषबाजीच्या जल्लोषात त्यांना त्यांच्या मूळ गावी बेलाटी बुजुर्ग तसेच तिरोडा येथील निवासस्थानी नेण्यात आले. दोन्ही ठिकाणी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या वतीने विजयकुमार पारधी तसेच त्यांच्या पत्नीचा आत्मीयतेने सत्कार करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *