सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त पूर्वतयारी बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी, दि. 19 /01/2026 राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महानगरपालिका आयुक्त मिलिंद नार्वेकर, वक्फ बोर्डाचे विशेष अधीक्षक खुस्रो खान, जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान खान पठाण तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्स हा धार्मिक व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असून दरवर्षी परभणी शहरात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या ऊर्सानिमित्त मराठवाड्यासह राज्य व शेजारील राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व संबंधित विभागांना ऊर्साच्या पूर्वतयारीसंदर्भात आवश्यक सूचना दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, जातीय सलोखा कायम राखणे तसेच प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी व संपूर्ण ऊर्स शांततेत पार पडावा, असे त्यांनी सांगितले.
ऊर्स कालावधीत कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. गर्दीचे योग्य नियोजन करावे तसेच कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगावी, असे निर्देश देण्यात आले.
सर्व विभागांनी आवश्यक सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने खबरदारी घ्यावी. अग्निशमन व अन्य सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. अन्नविषबाधेसारख्या घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
दि. 2 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.









