गुंज खुर्द येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, गुंज खुर्द येथे शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजलगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. प्रताप लेंडाळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राणुजी धोतरे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जाधव एच. एम. यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी डॉ. प्रताप लेंडाळ यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, आरोग्य क्षेत्रातील विज्ञानाची भूमिका तसेच वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्याचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेला बळी न पडता तर्कशुद्ध विचार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या जिज्ञासेला चालना दिली.
मुख्याध्यापक जाधव यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या संशोधनामुळे भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित आकर्षक व माहितीपूर्ण भित्तीपत्रके सादर केली होती.
यावेळी बालासाहेब खोपे व राणुजी धोतरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन साक्षी नेमाने व आदिती कचरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी लोमटे हिने केले.
या कार्यक्रमास शाळेतील गिरी , मुळे मॅडम, बद्दे , चिंते, पवळे सर, लव्हाळे सर तसेच लेंडाळ हॉस्पिटलमधील लॅब तंत्रज्ञ शिंदे सर यांची उपस्थिती लाभली. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन विज्ञानाविषयी आवड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.








