ताज्या घडामोडी

मुला-मुलींचे लग्नाचे वाढते वय

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

आपल्याकडे लग्नाला एक पवित्र बंधन समजले जाते.सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणाला साधी एकमेकांची विचारपूस करण्याची फुरसत नसते.तरूण पिढी तर सोशल मीडियाच्या जाळ्यात पूर्णतः अडकलेली आहे.हल्ली आणखी एक समस्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि ती म्हणजे तरूण- तरूणींचे लग्नाचे वाढते वय.हल्लीची पिढी हुशार आहे.त्यामुळे स्वबळावर काहीतरी चांगले करून दाखवण्याची त्यांची धडपड असते.हल्लीच्या मुलीही खूप शिकतात.त्यामुळे त्या वेल सेटल्ड होत पर्यंत लग्नाला तयार होत नाहीत.मुलांचीही तीच अवस्था असते.चांगली नोकरी मिळेपर्यंत किंवा व्यवसायात जम बसेपर्यंत ते लग्न करायला तयार नसतात.पूर्वीपेक्षा आजच्या जीवनात स्पर्धेचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे चांगले जीवन जगताना घर, पैसा,गाडी असावी असे प्रत्येकाला वाटते.त्यासाठी वेळ हवा म्हणूनही लग्नाचे वय वाढत चालले आहे. हल्ली मुले-मुली करियरला जास्त प्राधान्य देतात.विवाहास विलंब होणे आज एक सामाजिक समस्या झालेली आहे.मुले-मुली उच्चशिक्षण घेतात.करियरचा विचार करताना लग्नाचे वय बरेचदा निघून जाते.पहिले आई-वडील म्हणतील त्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न लावून दिले जायचे.आता परिस्थिती बदलली आहे.हल्ली मुले-मुली पहिले आवडीनिवडी जुळतात का ते
बघतात.त्यासोबतच कोण किती सॅलरी कमावतो तेही बघितले जाते.जर दोघांनाही पटले तरच मग लग्नाचा विचार केला जातो असेही चित्र ब-याचदा पाहायला मिळते.पूर्वी मुलीला स्वयंपाक येतो का,घरकाम येते का हे पाहिले जायचे.मुलाला चांगली नोकरी आहे का, घरदार आहे का अशा मोजक्या गोष्टी पाहिल्या जायच्या.मात्र आता मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आता मुलांना कमावणारी मुलगी हवी असते.मुलींनाही घरकामात मदत करणारा मुलगा हवा असतो.त्यासाठी मुले- मुली वाट बघतात.त्यामुळेही लग्नाचे वय वाढत जाते.अनेक मुलींना त्यांच्यापेक्षा कमी पगार असणारा मुलगा नवरा म्हणून नको असतो.जोपर्यंत त्यांना त्यांच्या मनाजोगा मुलगा मिळत नाही तोपर्यंत त्या लग्न करत नाही ही खरी परिस्थिती आहे.उगाच वय वाढवत बसण्यापेक्षा आलेले स्थळ उत्तम असेल तर लग्न करण्यास काहीच हरकत नाही.मुलींचे लग्न वेळेत न होण्यासाठी कधीकधी मुलींच्या आई-वडिलांचा अहंकार आडवा येतो.मुलाचा पगार, शिक्षण,बॅंक बॅलन्स इत्यादी गोष्टींची तुलना मुलीच्या पगाराशी, दिसण्याशी केली जाते आणि चांगल्या मुलांना नकार दिला जातो.मुलींप्रमाणे मुलांच्याही अपेक्षा असतात.मुलगी सुंदर, सुस्वभावी, उच्चशिक्षित असावी अशी बहुतेक मुलांची अपेक्षा असते.काही मुलांना उच्चशिक्षित बायको घरी राहणारी हवी असते.बरेचदा ही गोष्ट मुलगी आणि तिच्या घरचे लोक मान्य करीत नाही.मुला-मुलींच्या अवाजवी अपेक्षांमुळे दोघांचेही लग्नाचे वय वाढत जाते.
काही मुले कमी शिकलेली असतात.साहजिकच त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही.त्यामुळे त्यांच्यासाठी मुलगी शोधताना खूप अडचणी येतात.मग हळूहळू मुलाचे लग्नाचे वय वाढत जाते.मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलींना छोट्या शहरातील मुलगा नको असतो.त्या मोठ्या शहरांतून लहान शहरात जायला तयार होत नाहीत.जिथे फक्त पैसा पाहून लग्न केले जाते तिथे सांगणे कठीण असते की त्या जोडप्याचे पुढील आयुष्यात सूर जुळतील किंवा नाही.मग कित्येकदा त्यांच्यात खटके उडायला लागतात.मुलींचा शिकण्याकडे कल वाढल्याने त्यांचे लग्नाचे वय आपोआपच वाढत जाते.आता मुली शिक्षणाने मुलांच्या बरोबरीत आल्याने त्यांच्यात वैचारिक प्रगल्भता आली आहे.त्या आपली मते परखडपणे मांडतात.आजची तरूण पिढी उशिरा लग्न करीत असल्याने त्यांच्या आजी-आजोबा होण्याच्या वयात ते आई-बाप होतात.काही मुले-मुली लग्न करतच नाहीत.कारण एक तर त्यांचे लग्नाचे वय निघून गेलेले असते किंवा त्यांना कुठेतरी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भिती वाटत असते. समाजात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे.त्यामुळे साहजिकच त्यांच्या अपेक्षा वाढतात.याची कित्येक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. हल्ली तर मुले काय किंवा मुली काय, बहुतेक वेळा वयाची तिशी पार केल्यानंतर लग्न करतात.शेवटी समाजव्यवस्था टिकविण्यासाठी विवाहाचे बंधन आवश्यक आहे.विवाह जमवणे सोपी गोष्ट नाही.लग्न म्हणजे एकमेकांना समजून घेणे, जीवनातील परिस्थितीशी जुळवून घेणे असते.जी मुले- मुली ही गोष्ट समजून घेतात त्यांचे संसार निश्चितच चांगले होतील यात शंका नाही.समाजात आज कित्येक मुलं-मुली अविवाहित आहेत.एकतर त्यांचं लग्नाचं वय झालेलं असतानाही लग्न जुळत नाही किंवा लग्नाचे वय निघून गेलेले असते.त्यामुळे त्यांना लग्न करण्याची इच्छा उरत नाही.हल्ली तर परिस्थिती अशी झाली आहे की मुलींपेक्षा मुलांचं लग्न जुळवताना मुलांच्या आईवडिलांच्या अगदी नाकी नऊ येतं.याला कारण म्हणजे आता मुली खूप शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या होतात आणि त्यामुळे त्यांच्या होणा-या नव-याकडून भरपूर अपेक्षा असतात.अपेक्षा करणं चुकीचं नाही,पण अवास्तव अपेक्षा करणं चुकीचं आहे.माझ्याच जवळच्या नात्यात तीन मुली अशा आहेत ज्या उच्चशिक्षित आणि कमावत्या आहेत,पण त्यांच्या आणि मुलींच्या आईवडिलांच्या मुलाकडून खूप अपेक्षा असल्याने आज त्यांचे वय ३५-४० झाले असतानाही त्यांचे लग्न झालेले नाही आणि आता लग्न होण्याची शक्यताही मावळली आहे.असंच सुरू राहिलं तर कदाचित पुढे जाऊन लग्नपध्दत बंद होईल की काय अशी शंका येते.याचा परिणाम असा होईल की जास्तीत जास्त मुलं-मुली लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहायला लागतील.लिव्ह- इन ही पाश्चात्य संस्कृती आता हळूहळू आपल्या समाजातही रूढ होऊ पाहते आहे, नव्हे काही प्रमाणात झालेली आहे.अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच यात काही शंका नाही,पण फक्त पैशाच्या मागे लागून सांसारिक सुखाला वंचित राहायचे याला काय अर्थ आहे? फक्त पैसा, गाडी, बंगला म्हणजेच सर्वकाही नाही याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला पाहिजे.कधीकधी मुलीला मुलापेक्षा जास्त पगार आहे म्हणून इतर सर्व बाबी व्यवस्थित असतानाही स्थळ नाकारले जाते.फक्त पगार बघण्यापेक्षा मुलाचा स्वभाव जर चांगला असेल,तो निर्व्यसनी असेल तर अशा मुलाशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही.पगाराचे काय,पुढे जाऊन तो वाढेलच किंवा त्याला त्याहीपेक्षा चांगली नोकरी मिळू शकते.आपण सहसा लग्न जुळवताना मुलगा आणि मुलगी यांची कुंडली बघून किती गुण जुळतात ते बघतो.पण अशी अनेक जोडपी आहेत ज्यांचे ३६ पैकी ३६ गुण जुळुनही ते संसारात दु:खी आहेत.मुले-मुली शिक्षण आणि त्यानंतर नोकरी करीत असताना त्यांचे वय तसेही वाढलेले असते.त्यातही जर असं स्थळ नको,तसंच हवं असे करत राहिले तर चार-पाच वर्षे अशीच निघून जातात आणि मग आवडीचे स्थळ मिळेलच याची खात्री नसते.या जगात कुणीही परफेक्ट नाही.लग्न म्हटलं की कुठेतरी तडजोड करावीच लागते.फक्त मी म्हणेन तसेच व्हावे असे संसारात होत नाही.त्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.नाहीतर घटस्फोट हा होणारच.
पूर्वी घराणे पाहून लग्न जुळविले जायचे.घरातील मोठी माणसे यासाठी पुढाकार घेत.लग्नानंतर नवरा-बायकोत काही बिनसले तर घरातील मोठी माणसे त्यांच्यातील वाद मिटवायचे.मतभेद मनभेद होता कामा नये याची काळजी घेतली जायची आणि म्हणूनच पूर्वी लग्न टिकायचे.नवरा-बायको म्हातारपणी एकमेकांचा आधार असायचे.त्यांचे जीवन आंबटगोड अनुभवांतून जाऊन परिपक्व व्हायचे.पैसा किती आहे हे न बघता वर्तन, स्वभाव कसा आहे हे जर बघितले तर संसार नक्कीच आनंदी होऊ शकतो.प्रत्येकच नात्यात थोडेफार खटके उडत असतात.पण याचा अर्थ असा होत नाही की अगदी क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घ्यावा.सर्वच गुण एकाच व्यक्तीत कधीच असू शकत नाहीत.मुलामुलींचे वाढते वय ही सध्या गंभीर सामाजिक समस्या आहे.करियरची महत्वाकांक्षा, आर्थिक स्थैर्य मिळविण्याची धडपड आणि स्वातंत्र्याच्या अपेक्षेने तरूण मुलं-मुली लग्नासाठी उशीर करतात.काही तरुण मंडळींना लग्न म्हणजे बंधन वाटते आणि त्यामुळेही ते अविवाहित राहतात.उशीरा लग्न केल्यामुळे व्यक्तीमत्व परिपक्व झालेले असते आणि त्यामुळे कित्येकदा एकमेकांना समजून घेणे आणि जुळवून घेणे कठीण जाते.काही मुलामुलींचे विवाह जमत नसल्याने ते नैराश्यातून आत्महत्या करतात.विवाह एक सामाजिक बंधन आहे.समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी विवाह खूप महत्त्वाचा आहे.जसजसे लग्नाचे वय वाढत जाते तसतशी संतती प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते याचाही विचार व्हायला हवा.मुलामुलींनी सामंजस्याने विचार करून योग्य वयात विवाह करणे आवश्यक आहे.भरमसाठ अपेक्षा आणि गरजा असल्या की विवाह होणे जरा कठीण होऊन बसते.काही मुलं-मुली यासाठी लग्न करत नाहीत कारण त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते.लग्न हा निर्जीव व्यवहार नसून आयुष्यभराचे नाते आहे.विवाह म्हणजे फक्त प्रेम नाही,तर सामाजिक, आर्थिक, भावनिक जवाबदारी आहे.इथे दोन मनं जुळणं अधिक महत्त्वाचं आहे.लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही.इथे नातं टिकवण्यासाठी सामंजस्य, प्रेम,त्याग करण्याची इच्छा असावी लागते.लग्नासाठी योग्य वय किती असावे ही संकल्पना पिढीनुसार बदलत असली तरी एकमेकांच्या भावनांना, विचारांना महत्व देणे आवश्यक आहे.विवाह म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो.
आजची पिढी करियरस्टीक आहे.लग्नानंतरची जवाबदारी घेण्याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तयारी असणं खूप गरजेचं आहे.आज समाजात मुलामुलींचे विवाह लांबणे किंवा न होणे याकडे समाज चाललाय.अनेकदा असंही होतं की स्थळ निश्चित झाल्यावरही मुलाकडचे किंवा मुलीकडील मंडळी त्यापेक्षाही चांगलं स्थळ शोधत असतात.याला काय म्हणावे? एकप्रकारे ते नातं जुळवल्यानंतरही समोरच्याची फसवणूक करीत असतात.आपल्या समाजात विवाह एक पवित्र संस्कार आहे.लग्नासाठी काही अटी असतातच.पण त्याचा अतिरेक होऊ न देता फक्त काही क्षुल्लक कारणावरून चांगले स्थळ घालवणे यात काही राम नाही.आधुनिकीकरण, विकसित तंत्रज्ञान यामुळे समाजाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला आहे.त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.कदाचित यामुळेच लग्नाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे हे मात्र नक्की.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close