वीज पडून चार महिला ठार

एकाच कुटुंबातील दोन महिला व एका युवतीचा समावेश.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेत शिवारात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून दोन महिला व दोन युवती घराकडे निघाल्या. रस्त्यात त्यांच्यावर वीज कोसळल्याने चौघीचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
वरोरा तालुक्यातील चिमूर रोड लगत असलेल्या वायगाव भोयर येथील काँग्रेसचे वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या शेतात त्यांच्या पत्नी हिरावती शालिक झाडे(४५)
मधुमती सुरेश झाडे (२०) पार्वता रमेश झाडे (६५) रीता नामदेव गजबे (२०) या चौघी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास काम करायला शेतात गेले होत्या. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरू झाल्याने चौघेही घराकडे जाण्यास निघाल्या. पाऊस जोरदार असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घेतला. नेमकी त्याच ठिकाणी वीज पडल्याने चौघीचाही मृत्यू झाला. यात झाडे कुटुंबातील दोन महिला व एका युवतीचा समावेश आहे. तर एक युवती ही वायगाव येथील रहिवासी आहे. मृत मधुमती सुरेश झाडे ही वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालय वाणिज्य इंग्रजी माध्यम प्रथम वर्षाला शिकत होती.