ताज्या घडामोडी

जीवनापुर येथे महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायतच्या वतीने आठवडी बाजाराचे उद्घाटन

उमेद च्या माध्यमातून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल – संजय गजपुरे

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड तालुक्यातील आलेवाही गटग्रामपंचायत अंतर्गत जीवनापुर येथे राजमाता जिजाऊ ग्रामसंघ , ग्रामपंचायत आलेवाही ( जीवनापुर ) व उमेद च्या वतीने आयोजित आठवडी बाजाराचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आलेवाही च्या सरपंच सौ.योगीताताई सुरपाम तर विशेष अतिथी म्हणुन माजी पं.स. सभापती संजय घोनमोडे यांची उपस्थिती होती .
उडान प्रभागसंघ , राजमाता जिजाऊ ग्रामसंघ , बचतगट व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद च्या संयुक्त सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या या आठवडी बाजारातून स्थानिकांना ताजा भाजीपाला व अन्य वस्तू मिळणे सोयीचे होणार आहे. यापुर्वी आठवडी बाजारासाठी मोठ्या गावात जावे लागत असल्याने आता यामुळे होणारी पायपीट व वेळ वाचणार आहे. स्थानिकांना सुध्दा आपल्या वस्तू व भाजीपाला विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे .
उमेद मार्फत नागभीड तालुक्यात महिला बचत गट व ग्रामसंघाच्या वतीने अनेक छोटे उद्योग सुरु झाले असुन यात काम करणाऱ्या महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले व घरची कामे सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत तयार करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या सावित्रीबाईंच्या लेकींचे याप्रसंगी भरभरून कौतुक केले. संजय घोनमोडे यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत ग्रामीण भागातील महिलांच्या धाडस व पुढाकाराबाबत अभिनंदन केले .
याप्रसंगी आलेवाही गटग्रामपंचायत चे उपसरपंच निलेश नन्न्बोईनवार ,राजमाता जिजाऊ ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ.मायाताई टेंभुर्णे , सचिव सौ. निताताई चिलमवार , तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलजी टेकाम , पोलीस पाटील सौ. लताताई लाडे , ग्रामपंचायत आलेवाही चे सदस्य निळकंठ निकुरे व सौ. भावनाताई जनबंधु , ज्येष्ठ नागरिक राजेश्वरजी नन्नेबोईनवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिक व गावातील महिलांची लक्षणिय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेद चे तालुका व्यवस्थापक अमोल मोडक यांनी केले. स्वागत गीत सौ. अश्विनी बोरकर यांनी गायले. कार्यक्रमाचे संचालन समुह संसाधन व्यक्ती सौ. ज्योतीताई सोनवाणे यांनी केले तर आभार समूह संसाधन व्यक्ती सौ. संगीताताई गहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेद चे प्रभाग समन्वयक दिपक गायकवाड , शुभम देशमुख व गजानन गोहणे यांनी प्रयत्न केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close