नागभीड नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर
भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या मागणीला यश…
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड नगरपरिषद ही ९ ग्रामपंचायत मिळुन तयार झाली असुन अजूनही या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य सेवेच्या सुविधांसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केँद्रावर अवलंबुन राहावे लागत आहे. नगरपरीषदेची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असल्याने नागभीड येथे सर्वसोयीयुक्त स्वतंत्र नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी आरोग्य विभागाकडे केली होती. या मागणीला यश प्राप्त झाले असुन नागभीड नगरपरिषद क्षेत्रात अशाप्रकारची २ केंद्रे लवकरच सुरू होत आहेत.
नागभीड नगरपरिषद क्षेत्रात नागभीडसह नवखळा , डोंगरगाव , बाम्हणी , बोथली , चिखलपरसोडी , भिकेश्वर , खैरीचक , सुलेझरी , तिव्हर्ला व तुकुम या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागभीडच्या ग्रामीण रुग्णालय निर्मितीनंतर नागभीडसह ही सर्वच गावे आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायत असतानापासुनच नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहेत . यामुळे या केंद्राच्या माध्यमातुन राबविण्यात येणाऱ्या प्रत्येकच आरोग्य अभियानात नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण कल्याण समित्यांच्या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही बाब तत्कालिन जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर याबाबतचा पाठपुरावा त्यांनी आरोग्य प्रशासनाकडे सुरु केला होता.
नागभीड नगरपरिषद ही शहरी भागांत येत असल्याने रिक्त असलेल्या आशा सेविकांच्या जागा सुध्दा अजुनपर्यंत भरण्यात आलेल्या नाहीत . शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार लोकसंख्येचा आधार घेत नगरपरिषद अंतर्गत नागभीड येथे नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी संजय गजपुरे यांनी आरोग्य विभागाकडे ॲाक्टोबर २०२१ मध्ये केली होती . त्या मागणीच्या अनुषंगाने आता नागभीड नगरपरिषद क्षेत्रात दोन केंद्रांना मंजुरी प्राप्त झाली आहे . केंद्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निर्देशानुसार आता या केंद्रांना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र या नावांनी ओळखण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार अशा प्रकारचे एकुण २८ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र चंद्रपुर जिल्ह्यातील ९ नगरपरिषद व ६ नगरपंचायत च्या कार्यक्षेत्रात सुरु करण्याची मंजुरी प्राप्त झालेली आहे. ज्या ठिकाणी शासकीय इमारत ची जागा असेल तेथे तर ज्या ठिकाणी शासकीय इमारत नसेल तेथे भाडे तत्वावर घेण्यात येऊन आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे . प्राथमिक आरोग्य संस्थांना सक्षम करण्यासाठीचे विविध उपक्रम २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविले जाणार आहेत.
या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी केंद्र शासनाकडुन १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत राज्य शासनाकडे अनुदानाचा पहिला हप्ताही वितरित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान चे संचालक यांच्याकडुन या मंजुर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचना सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या मंजुरीसाठी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार , खास. अशोकभाऊ नेते , आम. बंटीभाऊ भांगडिया , विधानपरिषद सदस्य आम. डॅा. रामदासजी आंबटकर यांचे आभार मानले आहे.