गंगाखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयास नवीन इमारतीसाठी निधी द्या. – आ.गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून या ठिकाणी नवीन इमारत बांधणे अत्यंत आवश्यक असल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.
गंगाखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत १९७२ मध्ये लोडबेरिंगवर बांधलेली असून ती आज रोजी अत्यंत जीर्ण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सदरील इमारतीचे छत गळल्याने अनेकदा कागदपत्रांचे नुकसान झालेले आहे. या इमारतीत ३ न्यायाधीश न्यायदानाचे कार्य करतात. १२५ पेक्षा अधिक वकील बांधव वकिली व्यवसाय तर ७५ न्यायालयीन कर्मचारी कार्यरत असून शेकडो नागरिक व पक्षकारांची येथे दररोज ये-जा असते. सदरील इमारत पडण्या योग्य झाली असल्याने भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आज रोजी कामकाज चालत असलेली इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधकाम करणे अत्यंत आवश्यक असल्याने येथे नवीन इमारत बांधकाम करीता निधी मंजूर करण्याची मागणी आमदार गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.