पाथरीच्या एकतानगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून,आज दि. १८ जानेवारी,रविवारी रोजी एकतानगर भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक लहान बालकांवर हल्ला चढवला आहे.या हल्ल्यात मुलांच्या हाताला,पायाला,तोंडाला आणि डोळ्यांना गंभीर जखमा झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,या पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात लहान मुले रक्तबंबाळ झाली आहेत. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना तातडीने परभणी येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पालकांमध्ये प्रचंड संताप आणि चिंतेचे वातावरण असून,आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर स्थानिक समाजसेवक कदीर बापू यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यांनी सांगितले की,”शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली होती.आमरण उपोषणही केले होते.मात्र,प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.पालिकेच्या याच निष्काळजीपणामुळे आज निष्पाप बालकांना आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे.”
या भीषण घटनेमुळे त्रस्त पालकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.आता प्रश्न उपस्थित होत आहे की,नवनिर्वाचित नगराध्यक्ष या घटनेची गांभीर्याने दखल घेतील का?याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी (SDO) आणि नगरपालिकेचे सीईओ या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतील का?
पाथरीतील जनतेने आणि बाधित पालकांनी मागणी केली आहे की,नगरपालिकेने तातडीने मोहीम राबवून या पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.









