ऑनलाइन औषध विक्री धोरणाविरोधात पाथरीत केमिस्ट बांधवांचा कडकडीत बंद

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
केंद्र शासनाच्या ऑनलाइन औषध विक्री धोरणाविरोधात पाथरी शहरातील केमिस्ट बांधवांनी आज दिनांक 20 मे रोजी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपापली औषध दुकाने पूर्णतः बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. या बंदमुळे शहरातील औषध व्यवसाय दिवसभर ठप्प झाला होता.ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या अवैध औषध विक्री, ई-प्रिस्क्रिप्शनचा गैरवापर, तसेच अत्याधिक सूट व घरपोच औषध वितरणाच्या धोरणांमुळे लघु केमिस्ट व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत केमिस्ट बांधवांनी केंद्र शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला.या पार्श्वभूमीवर पाथरी शहरात केमिस्ट संघटनेच्या वतीने शांततापूर्ण पद्धतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथरी येथे जाऊन निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात अवैध ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर कारवाई करावी, वैध ई-प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री व घरपोच वितरणावर पूर्ण बंदी घालावी,

तसेच संबंधित शासन निर्णयांचा पुनर्विचार करून लघु केमिस्ट व्यवसायाचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.या आंदोलनात शहर व तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये बासू टेंगसे, जियाभाई, ज्ञानोबा वाघ, सनतकुमार बाकळे, हनुमान कोकाटे, प्रसाद पाटील, रोशन पठाण, कान्हा कासट, महादेव डुकरे, योगेश देशमुख, मोईजभाई, गणेश लिपणे, अजिंक्य देशमुख, भागवत डुकरे, भगवान गिराम, बालाजी चौधरी, अमोल वाघमारे, सुरेश सिताफळे, जमील अन्सारी आदी पदाधिकारी व केमिस्ट बांधव उपस्थित होते.दरम्यान, संपूर्ण शहरात औषध दुकाने बंद राहिल्याने जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम जाणवला. आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.









