पाथरीचा आठवडी बाजार पूर्ववत करा; नगर परिषद सदस्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार अचानक जुन्या जागेवर हलवल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.हा निर्णय रद्द करून बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्यात यावा,या मागणीसाठी नगर परिषदेच्या सदस्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार,दर गुरुवारी भरणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार १६ एप्रिल २०२६ रोजी कोणत्याही कौन्सिल ठरावाशिवाय अचानक जुन्या आठवडी बाजारच्या जागेवर भरवण्यात आला. नगर परिषदेच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
जुन्या आठवडी बाजारच्या जागेवर प्राथमिक सोयीसुविधांची मोठी कमतरता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तिथे बसण्यासाठी ओटे नाहीत,
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि सावलीसाठी झाडे किंवा शेड उपलब्ध नाहीत. जागा अपुरी असल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागत असून,उन्हामुळे शेतीमालाचे नुकसान होत आहे.परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
२३ एप्रिलचा अल्टिमेटम
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानावर लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत.तरीही बाजार हलवण्याचे कारण काय? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे. आगामी २३ एप्रिल २०२६ पासून आठवडी बाजार पुन्हा पूर्ववत जागेवर भरवण्यात यावा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सभागृह गटनेते अन्सारी मोहम्मद इब्राहिम यांच्यासह अन्सारी अब्दुल हातेम, राजेश पाटील, मो. कलिम अन्सारी, ॲड. मलीक पटेल, रंगनाथ विरकर, मिलिंद आठवले,नईम खान, अन्सारी आसेफोद्दीन आणि खुरेशी रज्जाक या नगर परिषद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









