डॉक्टरानंतर आता ऑटोचालकही सायबर भामट्यांच्या जाळ्यात; मोबाईल हॅक करून १.९६ लाखांवर डल्ला

ड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील एका खासगी डॉक्टरांचा मोबाईल हॅक करून १ लाख ४६ हजार ९९९ रुपये लंपास केल्याची घटना ताजी असतानाच, आता पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील एका ऑटोचालकालाही सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढले आहे. मोबाईल हॅक करून दोन टप्प्यांत त्याच्या बँक खात्यातून १ लाख ९६ हजार रुपये परस्पर वळते करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनांद्रा येथील नारायण पिराजी सावळे (वय ३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांचा मोबाईल काही काळ हॅक झाल्यासारखा बंद पडला. काही मिनिटांनी मोबाईल पूर्ववत सुरू झाला. रात्री फोनपे ॲप तपासले असता, त्यांच्या बँक खात्यातून दुपारी ३.०६ वाजता ९८ हजार रुपये Dibendu Das या नावाच्या खात्यावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या व्यवहाराबाबत मोबाईलवर कोणताही संदेश प्राप्त झाला नव्हता.

यानंतर ५ ऑगस्ट रोजी सायबर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुपारी ३.३४ वाजता आणखी ९८ हजार रुपये Soab8738kha या नावाच्या खात्यावर वर्ग झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर सावळे यांनी तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून खाते तात्पुरते बंद केले. मात्र तोपर्यंत त्यांच्या खात्यातून एकूण १ लाख ९६ हजार रुपये परस्पर वळते करण्यात आले होते.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(सी), ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४) अन्वये अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहे.









