जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमना पंत यांचा नागभीड तालुक्यात दौरा; महसूल कामकाज व विविध विकासकामांचा आढावा

प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत यांनी नागभीड तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात नागरिकांना शासकीय सेवा अधिक कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी प्राधान्याने RTS अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांबाबत आढावा घेतला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वेळेत व सुलभ पद्धतीने मिळावीत यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून जमिनीच्या डिजिटायझेशन बाबत आढावा घेण्यात आला. कामाची गती वाढविणे, नोंदी अचूक ठेवणे व पारदर्शकता राखणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
दौऱ्यादरम्यान मा. जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदामास भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी करून दर्जेदार व विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
याशिवाय, नगर परिषद नागभीड अंतर्गत सुरू असलेल्या “नमो उद्यान” प्रकल्पास भेट देऊन कामाची पाहणी करण्यात आली व मा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यावेळी प्रभारी तहसीलदार श्री उमेश कावळे, अपर तहसीलदार श्री शेखर पुणसे, नायब तहसीलदार श्री नरेश बोधे व श्रीमती स्मिता भैसारे, गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती सोनम देशमुख, उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती वंदना नाईक, तालुका कृषी अधिकारी श्री शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री बहादूरकर, निरीक्षण अधिकारी श्री चांदेकर तसेच पोलीस निरीक्षक श्री रमाकांत कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.
एकूणच या दौऱ्यात जिल्हाधिकारी यांनी प्रशासनातील विविध कामांची पाहणी करून कार्यक्षमतेस चालना देणारे मार्गदर्शन केले असून, नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस दिशा दिली आहे.









