ताज्या घडामोडी

पाथरीत आमदार सईद खान यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाथरीत आमदार सईद खान यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रलंबित कामांच्या तातडीने निपटाऱ्यासाठी अधिकाऱ्यांना जागेवरच निर्देश

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी-हिंगोली विधानपरिषदेचे आमदार तथा शिवसेना नेते सईद खान उर्फ गब्बर यांच्या पुढाकाराने पाथरी पंचायत समितीच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या तक्रारी आणि कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि शासन-प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार सईद खान यांनी सांगितले.

जनता दरबारात महसूल, पंचायत समिती, कृषी, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर विभागांशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्यापैकी अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणांवर विहित मुदतीत कार्यवाही करून संबंधितांना न्याय देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावेळी आमदार सईद खान यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या प्रलंबित कामांकडे संवेदनशीलतेने पाहण्याच्या आणि कोणत्याही पात्र लाभार्थ्याला शासनाच्या योजनांपासून वंचित ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. “सामान्य माणसाला शासकीय कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत. जनतेची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असेही नमूद केले.
या वेळी पाथरी चे उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण व तहसीलदार नितीन गर्जे व पोलिस निरीक्षक लक्षण केंद्र व हवे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
जनता दरबारामुळे अनेक नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाली. दीर्घकाळ विविध कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तक्रारदारांच्या अडचणींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना केल्याने जनता दरबाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close