पाल्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पालकांनी प्रोत्साहन द्यावे – सौ. भावनाताई नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
स्पर्धेच्या युगात आपले पाल्य टिकले पाहिजे या साठी प्रत्येक पालकाची धडपड चालू असते. शिष्यवृत्ती, ऑलंपियाड, एम. टी.एस, एन.एम.एम. एस, अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेऊन देशाच्या सनदी सेवेमध्ये रुजू व्हावे. याप्रकारचे यश मिळवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीप्रमाणे त्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत सौ. भावनाताई नखाते यांनी व्यक्त केले.
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित, शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे दिनांक 13 ऑगस्ट 2022 शनिवार रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात त्या अध्यक्षीय समारोप करताना बोलत होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मीराताई सरोदे, पालक प्रतिनिधी म्हणून श्री. सतीश हुले, श्री.महेश चिटणीस, श्री. अब्दुल करीम गुनके सर, प्राचार्य के.एन.डहाळे, मुख्याध्यापक यादव एन. ई., आदी उपस्थित होते.
आय.एम. ओ, एस. ओ. एफ., आय. ओ.आय., महाराष्ट्र टॅलेंट सर्च, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आदी स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्ण पदक, रजत पदक, ताम्र पदक व प्रमाणपत्रे प्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. चव्हाण बी.एम. यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अरविंद गजमल यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.