ताज्या घडामोडी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करावी- सदस्य डॉ.पी.पी.वावा

शासकीय योजनांचा सफाई कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी, दि. 05/10/2024 सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. आगामी तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात शिबिरे घेवून सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉ.वावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस सल्लागार श्री.गिरजेंद्र, समन्वयक श्री.चरण, ‍जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, महापालिका उपायुक्त मिनिनाथ दंडवते, नगरपालीका प्रशासक प्रदिप जगताप, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. वावा म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सफाई कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. सफाई कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही डॉ. वावा यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर केवळ अर्थसहाय्य न देता त्यासोबत त्यांच्या पाल्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृध्द आई-वडिलांना पेंशन तसेच त्यांना घर नसल्यास घरबांधणीसाठी सुध्दा अर्थसहाय्य करणे गरजेचे असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार कार्यवाही करण्यात यावी. अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रारंभी डॉ. वावा यांनी जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा आढावा घेतला. लाड पागे समितीच्या शिफारशीनूसार वारसा हक्क नियुक्ती प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचा व त्यातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच मैला सफाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मैला साफ करणाऱ्या मशीन सीएसआर निधीतून खरेदी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी तसेच अस्थायी व स्थाई सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबुट, हँडग्लोज, रेनकोट, थंडीचे स्वेटर आदी साहित्य वेळोवेळी पुरवठा करण्यात यावा. त्यांच्या ओळखपत्रावर मोबाईल क्रमांक, रक्तगट, ईपीएफ, ईएसआयसी नंबरही अनिवार्य करण्यात यावा. आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close