ताज्या घडामोडी

नेरी ग्रामसभेची तहकुब होण्याची परंपरा कायम

ग्रामसभे बाबत ग्रामस्थ उदासीन जनजागृतीची नितांत गरज

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

दिनांक ११ मे २०२२ रोज बुधवारला ग्रामपंचायत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्रामसभेची गणपूर्ती (कोरम) पूर्ण न झाल्यामुळे अखेरीस ग्रामसभा तहकूब करण्यात आली आणि तहकुब सभा दिनांक २१मे २०२२रोजी ठरविण्यात आली.
पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा म्हणून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. गावातील लोकांनी एकत्र यावे लोकांच्या गरजा काय आहे त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावाच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.
ग्रामसभेत किमान १०० किंवा एकूण मतदारांच्या १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती संख्या समजण्यात येते. ग्रामसभे पूर्वी प्रत्येक सदस्यांनी आपापल्या वार्डात वार्ड सभा घेणे बंधनकारक आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रामसभेत ग्रामस्थांचा सहभाग असणे गरजेचे आहे. गावा संबंधीचे विकास कामे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेला नसला तरीही ग्रामसभेत गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या मर्यादे पुरते ग्रामसभेत उपस्थित न राहता प्रत्येक ग्रामसभेत आवर्जून उपस्थित राहावे हे गावातील लोकांचे प्रथम सामाजिक कर्तव्य आहे. ग्रामसभे बाबत असलेली उदासीनता झटकून लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात आवर्जून सहभाग घेतला तर नक्कीच नेरी तील ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close