विद्यार्थ्यांना मिळणार गावातच शिक्षण व पदवी प्राप्त करण्याची संधी-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

प्रतिनिधीःकल्यानी मुनघाटे नागभीड
उश्राळमेंढा येथे विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमाचा शुभारंभ.
“ विद्यापीठ आपल्या गावात “ हा उपक्रम वंचितांना शिक्षण देणारा महत्वाकांक्षी शिक्षण प्रकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत व रोजगाराभिमुख शिक्षण गावामध्येच मिळणार आहे. यामधील वन आणि बांबूवर आधारीत शिक्षण रोजगार निर्मीतीकडे घेवून जाणारे आहे. पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी गावातच चालून आली असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले . ग्रामपंचायत उश्राळमेंढा, श्री. गोविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय, तळोधी (बा.) तथा आदर्श पदवी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथे “ विद्यापीठ आपल्या गावात “ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य व आदर्श पदवी महाविद्यालय समिती सदस्य सौ. किरणताई संजय गजपुरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक बोर्लावार, गोविंदप्रभु कला व वाणिज्य महाविद्यालय , तळोधी (बा.) चे प्राचार्य डॉ. ए.बी. रॉय, प्रा.अतुल कामडी, ग्रामसेवक योगेश्वर कापगते, विनोद सयाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवानंद डोर्लीकर, शाळा सुधार समिती अध्यक्ष रवी लोंढे, प्रा. सुमित बोरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. बोकारे यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीनुसार शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत रोजगाराभिमुख शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे हा या पदवी अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. १२ वी नंतर बी. ए. पदवीचे शिक्षण गावातच मिळणार आहे. तसेच या अभिनव उपक्रमामध्ये पुस्तकी शिक्षणाचा अतिरेक टाळून कौशल्य विकासावर भर देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत उश्राळमेंढा येथे वर्गखोलीचे उद्धाटन कुलगुरु डॉ. बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर या केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी कुलगुरुंनी हितगुज साधत संवाद केला व त्यांना शैक्षणिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या .
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर, संचालन लुकेश देवगडे तर आभार सहसमन्वयक प्रवीण गिरडकर यांनी मानले. तत्पुर्वी, दिपप्रज्वलन, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उश्राळमेंढा गावातील व परीसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.