ताज्या घडामोडी

सन 2047 चे व्हिजन ठेवून जिल्हा विकास आराखडा तयार करावा

  • निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सन 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याअनुषंगाने राज्याची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियनपर्यत घेवून जाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार सन 2047 दृष्टीकोन ठेवून परभणी जिल्ह्याचा सर्वागिंण विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा विकास आराखडा तयार करणे व नियोजन बाबतच्या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
सन 2047 पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव योगदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व विभागांनी सुयोग्य नियोजन करून सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेत, सन 2047 पर्यंत आपल्या विभागाचे चित्र काय असेल याबाबतचा सविस्तर माहितीसह विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करतांना जिल्ह्याचे क्षेत्रफळ, भौगोलिक स्थान, लोकसंख्या, उत्पादन, दरडोई उत्पन्न, आर्थिक वाढीचा दर, उद्योगाची संख्या, क्लस्टर, पार्क, आयटीआय, विशेष आर्थिक क्षेत्र, कृषि, वैद्यकीय, रोजगाराच्या संधी, निर्यातीचे प्रमाण यांचा विचार करावा लागणार आहे. तसेच सर्व विभागांनी जिल्ह्याचे प्रमुख मजबूत बलस्थाने आणि आणि कमकुवत बाजूंचा अभ्यास करुन, जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना श्री. वडदकर यांनी दिल्या.
बैठकीमध्ये उपस्थित विभाग प्रमुखांसोबत जिल्हा विकास आराखडा संदर्भात त्यांच्या विभागाच्या मुद्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच इतर सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close