रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदावर डी.एड. व बी.एड.धारक बेरोजगारांची नियुक्ती करण्याची महेश देवकतेंची मागणी
शालेय शिक्षण मंञ्यांकडे देवकतेंचे निवेदन सादर!
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
राज्यातील रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंञाटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती न करता राज्यातील बेरोजगार डी.एड/बी.एड धारक तरुणांची नियुक्ती करावी अशी रास्त मागणी पं.स.जिवतीचे माजी सभापती तथा भाजयुमोचे महेश देवकते यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंञी ना.दिपक केसरकर यांचेकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. या बाबतीत त्यांनी त्यांना एक लेखी निवेदन देखील सादर केले असल्याचे देवकते यांनी या प्रतिनिधीस आज चंद्रपूर मुक्कामी एका भेटीत सांगितले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 07 जुलै, 2023 रोजी काढलेले परिपञक आणि निर्णय हे संयुक्तिकरित्या नसून, त्या निर्णयाने राज्यातील डी.एड. व बी.एड .उत्तीर्ण असलेल्या बेरोजगारांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी पसरली आहे.
बेरोजगार डी.एड ,बी.एड धारकांना जि.प.शाळेच्या “प्राथमिक शिक्षक” पदांवर थेट नियुक्ती केल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल व त्यांचे उदरनिर्वाचा प्रश्न सुटेल तद्वतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.अशी अपेक्षा देवकते यांनी सादर केलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
राज्यात लाखोंच्या संख्येत डी.एड/बी.एड व अन्य पदविधर बेरोजगार तरुण-तरुणीं आहेत. अशा परिस्थितीत त्या तरुण-तरुणींचा सहानुभूती आणि एक सामाजिक बांधिलकीतून विचार करुन, त्या रिक्त पदावर सेवा निवृत्त शिक्षकांची 20000/-₹ मानधनावर नियुक्ती न करता बेरोजगार डी.एड/बी.एड धारकांची नियुक्ती करावी अशी मागणी शालेय शिक्षण मंञ्याकडे त्यांनी केली आहे.महेश देवकतेंच्या या रास्त मागणी कडे महाराष्ट्र शासन कितपत लक्ष देते या कडे आता संपूर्ण सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष वेधले आहे.हे मात्र तितकेच खरे आहे