ताज्या घडामोडी

अतीवृष्टीमुळे पडलेल्या घरांना तातडीने घरकुल मंजुर करा

भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांची मागणी

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व अतीवृष्टीमुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाल्याने त्या ग्रामस्थांना तातडीने विशेष बाब म्हणुन शासनाने घरकुल मंजुर करावे अशी विनंतीवजा मागणी भाजपा चंद्रपुर जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतीवृष्टीने ज्यांची घरे पुर्णत: पडली त्यांनी तात्पुरती निवासाची व्यवस्था करुन घेतली आहे. पण आर्थिक विवंचनेमुळे नवीन घर बांधणे अशक्यप्राय असल्याने तात्पुरत्या निवाऱ्यात किती दिवस काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे पुर्णत: पडलेल्या घरांची संख्या १००० हुन अधिक असुन महसुल यंत्रणेमार्फत शासनाकडे यादी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
अतीवृष्टीमुळे बेघर झालेल्या ग्रामस्थांमध्ये बहुतांश ओबीसी प्रवर्गातील असुन या प्रवर्गासाठी घरकुल संदर्भात कुठलीही विशेष योजना अस्तित्वात नाही. अनुसूचित जमाती साठी शबरी योजना , अनुसूचित जाती साठी रमाबाई घरकुल योजना तर भटक्या विमुक्त्यांसाठी यशवंतराव चव्हाण तांडा वस्ती योजना अस्तित्वात असल्याने या योजनेतून प्राधान्यक्रमाने अशा अतीवृष्टीने पडलेल्या घरांना घरकुल बांधकामाची मान्यता मिळत असते. यामुळे ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना केवळ प्रधानमंत्री आवास योजनेवरच अवलंबुन राहावे लागणार आहे. मात्र याची प्रतिक्षा यादी लांबलचक असल्याने यातून लवकर घरकुल मिळण्याची शक्यता धुसरच आहे.
यापुर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अतीवृष्टीने पडलेल्या घरांना घरकुल मंजुर होत होते. पण आता ही यंत्रणाच शासनाने बंद केल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील अतीवृष्टीने पडलेल्या घरांना विशेष बाब म्हणुन केंद्रशासन व राज्यशासनाने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुर करावे अशी मागणी संजय गजपुरे यांनी चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार व गडचिरोली चिमुर चे खासदार अशोकभाऊ नेते यांच्याकडे केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close