अत्याधुनिक ड्रोनद्वारे होणार गावठाण जमिनीची मोजणी
प्रत्येक घराचा होणार नकाशा तयार
प्रतिनिधी:सुनिल गेडाम
तालुक्यातील सर्वच गावात शासन आदेशानुसार गावातील गावठाण जमिनीचे जिआयएस आधारित सर्वेक्षण व भुमापन करण्याबाबतची योजना शासकीय स्तरावरून राबविण्यात येणार आहे आणि त्याची सुरवात तालुक्यातील प्रत्येक गावात झाली आहे. भूमिअभिलेख कार्यालयामार्फत गावात आपली एक टीम पाठवून संपूर्ण गावातील गावठाण जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप करून चुन्याच्या व पेंटच्या सह्याने खुणा करून ठेवल्या आहेत.गावाचे भुमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे, गावातील मालमत्तेचे जीआययस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणे अशा दोन भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावाची मोजणी झाली असून त्याची ड्रोनद्वारे मोजणी होणार आहे. अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्राचा वापर करून सर्व ग्रामपंचायतीच्या गावाचे गावठाणतील सर्व मिळकत धारकांचे मिळकतीचे मोजमाप, नकाशा व आखीव पत्रिका तयार करण्याचे काम जलदगतीने सुरु झाले आहे.
ड्रोनद्वारे गावठाण भुमापण हा महत्वाकांक्षी व जनताभीमुख प्रकल्प असून सदर प्रकल्पामुळे गावठाणतील सर्व मालमत्ताचे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून गावठाणतील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे आणि सर्व मालमत्ता धारकाच्या मालमत्तेचे सीमांकन निश्चित होऊन यापुढे प्रत्येक नागरिकांस आपल्या मालमत्तेची कर आकारणी भूमिअभिलेख कार्यालयातून मिळणे सोईचे होणार आहे.