दिलेला शब्द पाळणे ही आमची संस्कृती —खा बाळू धानोरकर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकाम व शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात प्रतिपादन
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा
वरोरा:- कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लोकांनी आमच्याकडे सत्ता सोपविली आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यां करता मिनी बस ची व्यवस्था करण्याचे दिलेले आश्वासन आम्ही पाळले याचा आनंद असल्याचे प्रतिपादन खा बाळू धानोरकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा च्या वतीने आयोजित वरोरा येथील बाजार समितीच्या 70 नवीन बांधकाम केलेल्या दुकानांचा आणि शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रतिभा धानोरकर , प्रमुख उपस्थिती म्हणून जि प चे माजी बांधकाम सभापती, प्रकाश मुथा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे ,उपसभापती देवानंद मोरे ,माजी सभापती विशाल बदखल, सुनंदा जिवतोडे आणि संचालक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खा धानोरकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता विमा काढण्याचे दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगत आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एक हाती सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आ प्रतिभा धानोरकर यांनी बाजार समितीने शेतकऱ्यां करता केलेल्या सहकार्याचे कौतुक करीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याच्या हिताचे कामे यापुढे सातत्याने करत राहणार असल्याचे सांगितले. आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांचे धनादेश त्यांच्या घरी जाऊन दिले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यातून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्या म्हणाल्या. प्रकाश मुथा यांनी बाजार समितीने केलेल्या चांगल्या कामामुळे व्यापाराची संधी उपलब्ध झाली, आणि बाजार समितीचे उत्पन्न भरघोस वाढले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा आढावा उपस्थितांत पुढे मांडत, बाजार समितीचे उत्पन्न आज पाच कोटींच्या घरात असल्याचे प्रतिपादित केले. या रकमेतून यापुढे शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबविले जातील आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गाळ्यांचे बांधकाम करणार्या मेहाडिया कन्स्ट्रक्शन च्या संचालकांचा ही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सचिव चंद्रसेन शिंदे यांनी तर आभार उपसभापती देवानंद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.