आदिवासी साहित्य हे समाजवादी साहित्य-कुसुम ताई अलाम
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
सामाजिक जनजागृती,नवी जीवनदृष्टी समाजात रुजवणे आणि समाजसुधारणा करणे हे ठसठशीतपणे आदिवासी साहित्यातून दिसत आहे.त्या अर्थाने आदिवासी साहित्य हे समाजवादी साहित्य आहे. असे स्पष्ट मत गडचिरोलीच्या सुपरिचित साहित्यिक कुसुम ताई अलाम यांनी व्यक्त केले.आदिवासी लेखकाला विषयासाठी भटकंती करावी लागत नाहीं. इतिहास, ज्ञान, परंपरा, अस्मिता अस्तित्व अध्यात्म, स्वाभिमान,जल, जंगल, जमीन खनिज संपत्ती, नैसर्गिक संसाधन याचा संघर्ष त्यांचे जवळ आहे.सामाजिक धार्मिक आध्यात्मिक संस्कार विस्कळीत करणारे जे जे आहेत त्या सा-या संस्था संघटना यांना आवर घालण्यासाठी मानवी जीवन समृद्ध व गतिमान करण्यासाठी आदिवासी संस्कृतीचा वारसा सांगत तिचा पुरस्कार करत लेखन केले पाहिजे असे कुसुम ताई अलाम आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या. सर्व आदिवासी लेखकांवर या राष्ट्राचीच नव्हे तर विश्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वणी येथे महाराणी दुर्गावती स्मृती पर्वावर नवोदित साहित्य परिषदेचे एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षिय भाषण करताना कुसुम ताई अलाम बोलत होत्या. अनेक साहित्यिक मंडळी व विचारवंत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.यावेळी वसंतराव कन्नाके लिखित क्रांतीकारी वीर बाबुराव शेडमाके चरित्रग्रंथ व विनोद आदे यांचा टूकार नावाचा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला.आदिवासी स्त्री काल आज उद्या ह्या परिसंवादाची सुबक मांडणी शितल ढगे, सुवर्णा वरखडे व प्रब्रम्हानंद मडावी यांनी केली होती.विविध सामाजिक आशयाच्या कविता आयोजित कवी संमेलनात सादर करण्यात आल्या.’मनीपूर जळत आहे’ ही सोनु दादा अलाम याची कविता दाद देऊन गेली.सदरहु परिषदेला उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिक प्रभु राजगडकर हे लाभले होते.जेष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम, दशरथजी मडावी, गीत घोष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमात उषाकिरण आत्राम यांना मधुकरराव मडावी साहित्य पुरस्कार व कुसुम ताई अलाम यांना व्यंकटेश आत्राम साहित्य पुरस्कार ,रोख दहा हजार रुपये , शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.वसंत कनाके, अशोक नागभिडकर निळकंठ जुमनाके ,दत्ता गावंडे,रामराजे आत्राम, धनराज मेश्राम,आशा कोवे, रजनी पोयाम, गणपत वेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .