पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण युवक-युवतीचा सत्कार
पारदर्शक व प्रामाणिक काम करून खाकीची शोभा वाढवा – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोणत्याही क्षेत्रात सातत्य, मेहनत आणि जिद्द ठेवली की, यश हमखास मिळतं. यशाला गवसणी घालण्यासाठी कष्टाची तयारी असावी लागते. त्यामुळे आजच्या नव्या पिढीनं संयम बाळगून मेहनत घेतली पाहिजे, तरचं त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. पोलिस दलात नौकरी करण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. मात्र प्रत्येकालाच यात यश मिळत नाही. परंतु कोणत्याही गोष्टीच भांडवल न करता अभ्यासात सातत्य ठेवलं की यशाचा मार्ग सुकर होतो. तुम्ही खूप कष्टाने इथंपर्यत पोहचला आहात. त्यामुळे पारदर्शक व प्रामाणिक काम करून खाकीची शोभा वाढवा, असा सल्ला पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील युवक-युवतींला आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत तालुक्यातील बडवनीचा युवक रमेश जगन्नाथ मुंडे आणि पांढरगाव येथील युवती डॉ.वर्षा भगवान ठुले हे उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा शहरातील राम-सीता सदन येथे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार घालून व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, अँड.मिलिंद क्षीरसागर, बडवणीचे सरपंच शंभूदेव मुंडे, प्रताप मुंडे, भगवान ठुले, जगन्नाथ मुंडे, मसलाचे सरपंच वैजनाथ शिंदे, संतोषराव पैके, विनोद किरडे, पत्रकार पिराजी कांबळे, नागरगोजे सर, बळीराम मुंडे, राजेभाऊ खोडवे यांच्यासह विविध पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, ग्रामीण युवक परिस्थितीशी तोंड देत जेव्हा यशस्वी होतात. तेव्हा त्यांचा अभिमान आणि आनंद सुध्दा वाटतो. पण त्यासाठी आई-वडीलांनी सुध्दा मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. या दोघांच्याही आई-वडीलांचा यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. असे युवक गावोगावी झाले तर सुशिक्षित बेरोजगार हा शब्दच उरणार नाही. मात्र यशस्वी झालेल्यांनी सुध्दा जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी चांगले काम करायला हवे. तेव्हाच प्रशासनात पारदर्शकता दिसेल. डॉ.वर्षा ठुले आणि रमेश मुंढे या दोघांनीही जिद्दीच्या बळावर हे यश मिळवलं आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झालं पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रभारी हनुमंत मुंडे तर आभार स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाम ठाकूर, गोपी नेजे, राहूल गाडे, चेतन पंडित, प्रभाकर सातपुते यांनी परिश्रम घेतले.