होळकर कालीन धान्य तारण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा- सखाराम बोबडे पडेगावकर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शेतकऱ्याच्या हिताची असलेली धान्य तारण योजना राजे मल्हारराव होळकर यांनीच सुरू केली होती. आज वखार महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान्य तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी शनिवारी गंगाखेड येथे शेतकरी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात धान्य तारण योजनेच्या जनजागृतीसाठी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर , वखार महामंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी म. ऊ. सूर्यवंशी, सहकार विकास महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनाचे वरिष्ठ सल्लागार भाऊसाहेब टेमकर , साठा अधीक्षक एस एम वंजारे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक रमेश शिरस, अंकुश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब केंद्रे, रामजी धनवटे, मशनेर वाडी चे माजी सरपंच जयदेव भिशे , अजंटा कंपनीचे रोहिदास निरस आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बोबडे म्हणाले की वखार महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी धान्य तारण योजना एक आदर्श योजना आहे. हि शेतकऱ्यांच्या हिताची योजना असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे .योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास शेतकरी आत्महतेचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती .ती आजही चालूच आहे. अगदी अत्यल्प व्याजदर व मोजक्याच कागदपत्राद्वारे या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा घेता येतो .तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तीराम आळसे आदी सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.