उपचारा अभावी नवजात बाळाचा मृत्यू

पालांदुर ग्रामीण रुग्णालयातील घटना

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखनी तालुक्यातील नरव्हा येथील एका गरोदर महिलेस प्रसूती वेदना होत असताना बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालय पालांदुर येथे नेले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते.स्त्री परीचारीकेने तपासणी करून प्रसुतीगृहात ठेवले, सहा तासानंतर प्रसूती झाली त्यात नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना (दिनांक 22) रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.
मनिषा महेंद्र शहारे रा. नरव्हा हिची प्रथम खेपेची प्रसुती असल्यामुळे तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याचे कुटुंबियांचे निदर्शनास येताच पहाटे तीन वाजताचे सुमारास आशा स्वयंसेवीका भारती काळसर्पे हिच्या सहायाने तिला ग्रामीण रुग्णालय पालांदुर येथे नेण्यात आले,रात्र पाळीत डॉ. आशीष बोदेले हे कर्तव्यावर असले तरी उपस्थित नव्हते.उपस्थित स्त्री परीचारीकेने तिची तपासणी करून प्रसुतीगृहात नेले, ती तब्बल पाच ते सहा तास प्रसुतीगृहात असतांना वैद्यकिय अधिकारी फिरकले नाही त्यामुळे तिला योग्य ते उपचार न मिळाल्याने प्रसुती झाली तथा नवजात बालकांचा मृत्यू झाला.ग्रामीण रुग्णालय पालांदुर येथे रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहत असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे.नवजात दगावण्याची तीन महिन्यांतील ही दुसरी घटना असुन २१ ऑगस्ट २०२१ला उरकुडे कुटुंबातील नवजात बाळाचा अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित कर्तव्यावर उपस्थित राहण्याची सुचना करणे आवश्यक झाले आहे.
प्रतिक्रिया
प्रसूतीसाठी महिला दवाखान्यात भरती झाली तेव्हा मी हजर नव्हतो, पण प्रसुतीचे वेळी उपस्थित होतो. नवजात बाळाचे गळयाला नाळ गुंफलेली होती,हाय रिस्क प्रसूती असल्याचे तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
डॉ. आशिष बोदेले,
वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय पालांदुर