ताज्या घडामोडी

नागभीड येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करावे – जि.प.सदस्य संजय गजपुरे

नागभीड प्रतिनिधीः आनंद विस्तारी मेश्राम

मो.9923420085

नागभीड नगरपरिषद ही ९ ग्रामपंचायत मिळुन तयार झाली असुन अजूनही या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य सेवेच्या सुविधांसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबुन रहावे लागत आहे . नागभीड नगरपरिषद ची लोकसंख्या २५ हजारच्या आसपास असल्याने नागभीड येथे सर्वसोयीयुक्त स्वतंत्र नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्याची मागणी जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी राज्याचे आरोग्य प्रशासनाकडे केली आहे.
नागभीड नगरपरिषद क्षेत्रात नागभीड सह नवखळा , डोंगरगाव , बाम्हणी , बोथली , चिखल परसोडी , भिकेश्वर , खैरी चक , सुलेझरी , तिव्हर्ला व तुकुम या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागभीड सह ही सर्वच गावे आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायत असतानापासुनच नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहेत . आरोग्यासाठी निगडीत प्रत्येकच बाबींसाठी या क्षेत्रातील जनतेला व कर्मचाऱ्यांना अजुनही या केंद्रात जावे लागते. नागभीड नगरपरिषद ही शहरी भागात येत असल्याने रिक्त असलेल्या आशा सेविकांच्या जागा सुद्धा अजुनपर्यंत भरण्यात आलेल्या नाहीत.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार लोकसंख्येचा आधार घेत नगरपरिषद अंतर्गत नागभीड येथे नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे अशी मागणी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी आरोग्य प्रशासनाकडे केली आहे. या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी आवश्यक नागभीड- ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गा लगतची धम्माणी पेट्रोल पंपाजवळील जि.प.आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेली अंदाजे दिड एकर जागा उपलब्ध असल्याचे संजय गजपुरे यांनी नमुद केले आहे. याबाबत नागभीड नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करुन याबाबत ठराव घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे गजपुरे यांनी सांगितले आहे.
नागभीड येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाल्यास नगरपरिषद क्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकते. कोरोनामुळे आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली असुन उत्तम आरोग्य सेवा उपलब्धी साठी लोकांचा कल वाढु लागला आहे . यासाठी शासनाने तातडीने नागभीड येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री नाम. राजेशजी टोपे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार , माजी पालकमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार , खासदार अशोकभाऊ नेते , चंद्रपूर जि.प.च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले , आमदार बंटीभाऊ भांगडिया , विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्याकडे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close