ताज्या घडामोडी

मोबाईलचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी कौशल्य व संवादकौशल्य विकसित करावे –प्रा. डॉ. अजय पिसे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये प्रभावी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध कौशल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा केवळ मनोरंजनासाठी कमी वापर करून त्याचा उपयोग ज्ञानार्जन, अभ्यास, नवीन कौशल्ये शिकणे आणि संवादकौशल्य विकसित करण्यासाठी करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अजय पिसे यांनी केले. नेहरू महाविद्यालय, चिमूर येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री. धाकुलकर सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोंढे सर यांनी केले, तर श्री. अभिजित गोमासे सर यांनी प्रास्ताविक करून प्रमुख अतिथी डॉ. अजय पिसे यांचा परिचय करून दिला. श्री विशाल इंदोरकर हे अतिथी म्हणून कार्यक्रमाला हजर होते.

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अजय पिसे यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, नवीन युगाचे AI तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या कौशल्यांवरही भर देण्याचे आवाहन केले. “मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रभावी साधन ठरू शकतो; त्याचा वापर योग्य दिशेने केला तर तो ज्ञान, कौशल्य आणि करिअरच्या संधींचे प्रभावी माध्यम बनतो,” असे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले.
विद्यार्थ्यांनी दररोज नवीन माहिती आत्मसात करणे, चांगले वाचन करणे, इंग्रजी व मराठी भाषेतील संवादाचा सराव करणे तसेच उपलब्ध डिजिटल साधनांचा शैक्षणिक उपयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ पदवी मिळविण्यापेक्षा कौशल्यसंपन्न आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडविणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हा कार्यक्रम प्राचार्य श्री निशिकांत मेहरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उमरे मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडला, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू कनिष्ठ व उच्च महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, कौशल्य विकास आणि डिजिटल साधनांचा सकारात्मक वापर याबाबत मार्गदर्शन मिळाले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close