आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते आलापल्लीत खावटी अनुदानाचे वाटप
महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 20 जुलै रोजी आलापल्ली येथे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना साह्य करण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते आलापल्ली येथील ग्राम पंचायतीच्या सभागृहात खावटी अनुदानाचे वाटप करण्यात आले.
वाटप समारंभाच्या उदघाटनस्थानी आ.धर्मराव बाबा आत्राम होते तर अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, उप प्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) बाळाप्रसाद बरकमकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, 2013 साली बंद पडलेली खावटी योजना आता अनुदान स्वरूपात पूर्ववत महाविकास आघाडी सरकारने प्रारंभ केल्याने गोर-गरीब आदिवासी बांधवांसाठी ही एक नवसंजीवनी असल्याचे गौरवदगार काढून राज्यसरकारचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आभार मानले. तसेच ऐन कोरोनाच्या महामारीत ही मदत खऱ्या अर्थाने फायदेशीर व कधीही न विसरण्यासारखे असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी 30 लाभार्थ्यांना खावटीच्या स्वरूपात अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच विनोद आकनपलीवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण येरावार, पुष्पाताई अलोने, अनसुर्या सपीडवार सारिका गडपल्लीवार, सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार, स्वप्नील श्रीरामवार आदी व खावटी वाटपाचे सहाय्यक प्रशांत डांगे, ग्रेडर अनंत आलाम आणि खावटी अनुदानाचे लाभार्थी व महिला भगिनी उपस्थित होते.