ताज्या घडामोडी

गांगला मत्स्यपालन संस्थेच्या सदस्यत्वप्रश्नी

२९ सप्टेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा; तहसीलदारांमार्फत प्रशासनाकडे न्यायाची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

तिरोडा तालुक्यातील गांगला येथील मागासवर्गीय मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. क्र. १०१ मधील सदस्यत्वाच्या प्रश्नावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी तहसीलदार, तिरोडा यांच्यामार्फत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून २९ सप्टेंबर रोजी कोडेलोहारा येथील तलाव व ग्रामपंचायत परिसरात तीव्र आंदोलन करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, कोडेलोहारा येथील ४७ व्यक्तींना गांगला येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सदस्यत्व देण्याबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), भंडारा यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २३(१) अन्वये संस्थेला निर्देश दिले होते. मात्र, संबंधित संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी या निर्देशांची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप प्रहारने केला आहे.
या प्रकरणी संस्थेच्या कामकाजाबाबत प्रशासक अथवा प्रशासकीय समिती नियुक्त करण्याच्या अनुषंगाने नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच संस्थेची चौकशी करून सभासदांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने वंचित घटकांना न्याय मिळालेला नाही, असा दावा संघटनेने केला आहे.प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, तसेच आंदोलनास आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, तिरोडा तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच कोडेलोहारा ग्रामपंचायतीकडेही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *