प्रत्येक ठेवीदाराच्या नावाने एक वृक्ष; तुळजाभवानी अर्बनच्या अभिनव उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जबाबदारी जपत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., शाखा पाथरी यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आगळावेगळा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या नावाने एक वृक्ष लावण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत पर्यावरण संरक्षणासोबतच समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश संस्थेने दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व, वाढते प्रदूषण, हवामान बदलाची गंभीर समस्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन बँकेचे रिजनल मॅनेजर कल्याण शिंदे ,पाथरी शाखेचे व्यवस्थापक हरीदास यांनी केले .

यावेळी लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे नियमित संगोपन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला. “आज लावलेला प्रत्येक वृक्ष उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरेल,” असा आशावाद व्यक्त करत पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह कै. मारोतराव धर्मे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र (नाना) धर्मे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ताराव जाधव, मुख्याध्यापक सुभाषराव चिंचाणे , पत्रकार विठ्ठल प्रधान, तुळजाभवानी अर्बनचे रिजनल मॅनेजर कल्याण शिंदे, पाथरी शाखेचे व्यवस्थापक हरिदास, अफसर शेख, रामा सौंदरे, अजीम शेख, शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणी बुद्रुक येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. अशा अभिनव उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाची जनजागृती होण्यास चालना मिळेल, पर्यावरणाबाबत सकारात्मक विचार रुजतील आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश देणारा हा उपक्रम लोणी बुद्रुक परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., शाखा पाथरी यांच्या वतीने करण्यात आले.









