तळागाळातील कर्तृत्ववानांचा ‘लोकप्रेरणा पुरस्कार २०२६’ने गौरव

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमूर-नागभीड परिसरात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, क्रीडा, पत्रकारिता, उद्योजकता व जनसेवा अशा विविध क्षेत्रांत तळागाळात निस्वार्थपणे व अविरत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा रेडिअन्स फौंडेशन तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘लोकप्रेरणा पुरस्कार २०२६’ ने गौरव करण्यात आला. कोलारा गेटजवळील अजिंक्य रिसॉर्ट येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात रेडिअन्स फौंडेशनचे अध्यक्ष श्री. घनश्यामजी पिसे व श्री. प्रभाकरजी पिसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
यावर्षीचा ‘लोकप्रेरणा पुरस्कार’ सातारा (ता. चिमूर) गावाचे सरपंच श्री. गजुभाऊ गुडधे यांना प्रदान करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे कार्य करत स्वतः आदर्श नेतृत्व उभे करून सातारा गावाला आदर्श गाव बनविण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून, व्यावसायिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे श्री. नितेश गणवीर, श्री. शिगाल पाटील, श्री. लिलेश्वर कोसे आणि श्री. प्रमोद पिसे, श्री किशोरजी मगरे, उत्कर्ष पिसे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षणाबाबत मागासलेल्या परिसरात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करणारे श्री. सुरेश दागोजी पिसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रात कराटेमध्ये ‘शिफु’ आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देणारे श्री. डॉ. सुशांत इंदोरकर, योगशास्त्राच्या माध्यमातून समाजसेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे श्री. निरंजन बोरकर, सामाजिक व राजकीय क्षेत्रात जनहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे श्री. विलासजी रामचंद्र डांगे, पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. योगेशजी सहारे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने पुढाकार घेणारे श्री. कवडुजी लोहकरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समाजोपयोगी योगदानाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विलासजी दिघोरे, श्री. आदित्य पिसे, श्री. विशाल इंदोरकर, श्री. वामन धारने आणि श्री. रामकृष्ण उपलांटीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.









