गोंदिया–नागभीड–चांदाफोर्ट–बल्लारशाह रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्यांचा खोळंबा

संतप्त प्रवाशांकडून तीव्र नाराजी.
प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर झोन अंतर्गत येणाऱ्या गोंदिया–नागभीड–चांदाफोर्ट–बल्लारशाह या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या नियमितपणे किमान ४ ते ६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जंगलव्याप्त व एकेरी रेल्वे मार्ग असलेल्या या विभागात मागील दोन ते अडीच वर्षांपासून मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्रवासी गाड्यांपेक्षा मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
हा मार्ग उत्तर व दक्षिणेला जोडणारा अत्यंत जवळचा व महत्वाचा असल्याने या मार्गावर अनेक लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील अनेक रेल्वे स्थानके जंगलालगत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने प्रवासी आपल्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचू शकत नाहीत. परिणामी पुढील प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत असून अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवासी गाड्या अनेकदा तासनतास एकाच स्थानकावर थांबविल्या जातात, तर त्याचवेळी मालगाड्या मात्र पुढे सोडल्या जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतप्त प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आहेत. प्रवाशांच्या नाराजीमुळे स्थानकांवरील कर्मचारीदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी संतप्त प्रवाशांकडून मालगाड्या रोखण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. तसेच सोशल मीडियावर रिल्स व व्हिडिओद्वारे रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. “रेल्वे मंत्रालयाला या मार्गावर केवळ मालवाहतूकच करायची असेल, तर प्रवासी गाड्या बंद करून टाकाव्यात,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवासी व्यक्त करीत आहेत.
एकीकडे देशभरात रेल्वे व्यवस्थेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना हा मार्ग मात्र प्रवासी सेवेसाठी बेभरवशाचा ठरत असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर हुन गोंदिया ला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा व स्वस्त रेल्वे मार्ग असून प्रवाशांची याला मोठी पसंती आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत या मार्गावर सुमारे २२ मालगाड्या चालवल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे विविध स्थानकांवर प्रवासी गाड्या दीर्घकाळ थांबतात. पिण्याचे पाणी, नाश्ता व इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून उकाड्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे.
यासंदर्भात अनेकदा रेल्वे प्रशासनाला निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यात आलेली नसून उलट प्रवासी गाड्या उशिरा धावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
या मार्गावरील प्रवासी वाहतूक नियमित व वेळेवर सुरू करावी, अन्यथा प्रवासी वाहतूक बंद करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर झोनचे झेडआरयूसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.








