नागभीड येथे नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे टप्पानिहाय प्रशिक्षण

प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , महाराष्ट्र शासन मार्फत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा आयोजित पंचायत समिती नागभीड अंतर्गत इयत्ता दुसरी ते चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे टप्पानिहाय प्रशिक्षण सांजो पब्लिक स्कूल, नागभीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीताताई भंडारे या होत्या.

उद्घाटक म्हणून बोलताना संजय गजपुरे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात होत असलेले बदल ही काळाची गरज असून त्यांचे स्वागत केले पाहिजे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, कृतीआधारित अध्यापन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक शाळा अधिक सक्षम व परिणामकारक बनविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. नव्या बदलांचा सकारात्मक स्वीकार करून शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावेल. कान्व्हेंटच्या स्पर्धेत तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून विद्यार्थ्यांना प्रभावी जीवनमुल्यांचे शिक्षण हे मराठी शाळांमध्येच मिळत असल्याचे नमूद करीत अशा प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातुन याची उजळणी होत असल्याचे प्रतिपादन केले.

सत्र २०२६-२७ मध्ये शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तसेच आवश्यक प्रशासकीय व शैक्षणिक कार्यवाही याबाबत सुनीताताई भंडारे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी सॅंजो पब्लिक स्कुलच्या आकुलवार मॅडम, तालुका प्रशिक्षण समन्वयक जगजीवन राऊत, बीआरसी तज्ज्ञ गटाचे सदस्य, प्रशिक्षण सुलभक तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते.प्रशिक्षणादरम्यान नवीन अभ्यासक्रमातील बदल, त्यामागील उद्दिष्टे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आणि वर्गशिक्षणात आवश्यक असलेल्या कृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागभीड चे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सत्राचे संचालन संजय येरणे यांनी तर आभार देवानंद तुळकाणे यांनी केले. नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असून, प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.








