विजयकुमार घरत यांचा सेवापूर्ती व ऋणानुबंध सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
कला व वाणिज्य महाविद्यालय, भिसी येथील वरिष्ठ लिपिक विजयकुमार घरत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती व ऋणानुबंध सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरराव अडबाले विधान परिषद सदस्य, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून अजय देशमुख (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समिती) तसेच प्रा. राम राऊत (जिल्हा उपसेवाधिकारी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, चंद्रपूर) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष संजयजी बोमेवार, सचिव सुनीलजी जावडेकर, कोषाध्यक्ष दामोदरजी केदार यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून वासुदेवराव धारणे (माजी अध्यक्ष, माना आदिम जमात मंडळ, मुंबई), प्रकाश म्हसे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), रावसाहेब त्रिभुवन (महासचिव, महाराष्ट्र राज्य शासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ) आणि संदीप हिवरकर (महासचिव, विदर्भ अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना) उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयकुमार घरत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने व शिस्तबद्धपणे कार्य केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्यात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. घरत यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, संयमी स्वभाव आणि संस्थेप्रती असलेली बांधिलकी यांचा विशेष उल्लेख केला. सेवानिवृत्ती ही सेवेतून मुक्तता असली तरी समाजकार्य व अनुभवातून पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना विजयकुमार घरत यांनी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सहकारी कर्मचारी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले. आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वीपणे जबाबदारी पार पाडू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, हितचिंतक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावनांनी ओथंबलेल्या या सेवापूर्ती व ऋणानुबंध सोहळ्याने उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या.
“कर्तव्यनिष्ठ सेवेचा प्रवास पूर्ण झाला असला तरी श्री. विजयकुमार घरत यांनी जपलेले ऋणानुबंध, कार्यसंस्कृती व सेवाभाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.









