वाळू माफियांचा पाथरीत हैदोस

पकडलेले वाहन पळवण्यासाठी सिनेस्टाइल थरार; जीवे मारण्याचा केला प्रयत्न
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
पाथरी : तालुक्यात अवैध वाळू माफियांची वाढती दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. ९ जुलै रोजी दुपारी सोनपेठ रोडवरील शासकीय गोदाम परिसरात तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला हायवा ट्रक जप्त केला. मात्र, तो तहसील कार्यालयाकडे आणत असताना वाहन पळवून नेण्यासाठी माफियांनी अक्षरशः सिनेस्टाइल थरार घडविल्याचा उल्लेख शासकीय फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पकडलेल्या ट्रकमध्ये (क्रमांक सीजी १९ बी.व्ही. ७०२९) महसूल कर्मचारी सोपान नरवडे यांना बसवून ताफा पाथरीकडे निघाला होता. त्याचवेळी एका कारने ताफ्याचा पाठलाग सुरू केला. माळीवाडा रस्त्यावर ट्रक अचानक वळवून धावत्या वाहनातून रस्त्यावर वाळू टाकत पळ काढला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या महसूल
विभागाची दोन्ही वाहने अडकली. एवढ्यावरच न थांबता पाठलाग करणारी खासगी कार रस्त्यात आडवी लावून महसूल पथकाचा मार्ग रोखण्यात आला. चालक वाहन सोडून पसार झाला. ट्रकमधील कर्मचाऱ्याला मारहाण करून खाली ढकलण्यात आले तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही उल्लेख शासकीय फिर्यादीत आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण शासकीय वाहनातून झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

घटना घडल्यानंतर महसूल विभागाने तातडीने तक्रार दिली. मात्र ९ जुलैला घडलेल्या घटनेचा गुन्हा ११ जुलै रोजी रात्री उशिरा दाखल झाल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महसूल विभागाचे म्हणणे आहे की तक्रार वेळेत देऊनही कारवाई झाली नाही, तर संबंधित महसूल अधिकारी वेळेत उपलब्ध न झाल्याने विलंब झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अखेर वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्यानंतर पाथरी पोलिसांनी चंदू राठोड, वाहन मालक आणि विष्णू घुगे यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
विलंबाचे गूढ कायम
दरम्यान, घटना ९ जुलैला घडली, तर गुन्हा ११ जुलैच्या रात्री दाखल झाला. या दोन दिवसांत प्रकरण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा विलंबासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असताना, प्रत्यक्षात गुन्हा दाखल होण्यास इतका वेळ का लागला, हा प्रश्न कायम आहे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे.









