ताज्या घडामोडी

असली हिंदू आणि नकली हिंदू : धर्माचा बाजार की धर्माचा आधार?

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

आज भारतात “हिंदू” हा शब्द पूर्वीपेक्षा अधिक चर्चेत आहे. राजकारणात, समाजकारणात, निवडणुकांमध्ये, टीव्हीवरील चर्चांमध्ये आणि सोशल मीडियावर—सर्वत्र हिंदुत्व, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची चर्चा होताना दिसते. हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्याचा वापर कसा होतो याचाही विचार होणे आवश्यक आहे.

हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि व्यापक तत्त्वज्ञानांपैकी एक मानला जातो. त्याची ओळख केवळ पूजा-पद्धती किंवा बाह्य चिन्हांनी होत नाही; तर सत्य, करुणा, संयम, कर्तव्य, सहिष्णुता, विवेक आणि सर्व जीवांप्रती आदर या मूल्यांनी होते. “सर्वे भवन्तु सुखिनः”, “वसुधैव कुटुंबकम्”, “अहिंसा परमो धर्मः” यांसारखी तत्त्वे ही हिंदू विचारपरंपरेची ओळख आहेत.

मात्र आजचा प्रश्न वेगळा आहे — धर्म जगला जात आहे की दाखवला जात आहे?

आज हिंदू समाजासमोर सर्वात मोठे आव्हान बाह्य विरोधकांचे नाही; तर धर्माच्या नावाने निर्माण होणाऱ्या दिखाऊपणाचे, अंधानुकरणाचे आणि स्वार्थी वापराचे आहे. आज स्वतःला धर्मरक्षक म्हणवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कपाळावरील टिळा, गळ्यातील माळ, सोशल मीडियावरील धार्मिक पोस्ट किंवा मोठमोठ्या घोषणा यांपेक्षा सत्यनिष्ठ व्यवहार, भ्रष्टाचाराला नकार, स्त्रीचा सन्मान, पर्यावरणाचे रक्षण, गरजूंना मदत आणि प्रामाणिक कर्तव्यपालन हेच धर्माचे खरे दर्शन घडवतात.

हिंदू धर्माव्यातिरिक्त इतर कुठल्याही धार्मिक उत्सवात कधीही अश्लील गाण्यावरचा DJ आणि डान्स ऐकीव नाही. याउलट गणेशस्थापनेच्या किंवा नवरात्र उत्सवात मोठमोठ्या आवाजात अश्लील हरकती करत नृत्य करणारे खरच असली हिंदू आहेत का? आपल्याच देवांची रंगभूषा करून पात्र सादर करतांना विटंबना करणारे खरच असली हिंदू होऊ शकतात? देवळातील दानपात्रावर डल्ला मारणारे, मंदिरातील चोरी उघळकीस आल्यावर चूप बसणारे, मंदिर परिसरात होत असलेल्या अत्याचारावर चूप बसणारे खरे हिंदू होऊ शकतात का? जमा झालेल्या वर्गणीतून दारू-पार्टी करणारे खरे हिंदू होऊच शकत नाहीत? अंधभक्तीच्या नावाखाली रक्तपात करणारे खरे हिंदू होऊ शकतात का?

अलीकडच्या काळात धार्मिक प्रतीकांचा, घोषणांचा आणि भावनांचा सार्वजनिक वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. श्रद्धेचे रूपांतर जर प्रसिद्धी, आर्थिक लाभ किंवा राजकीय ध्रुवीकरणाचे साधन बनले, तर धर्माचा मूळ हेतू मागे पडतो.

खरा हिंदू कोण? जो सत्याचा स्वीकार करतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो, श्रमाचा सन्मान करतो, सर्व धर्मांचा आदर करतो, दुर्बलांना आधार देतो आणि स्वतःच्या जीवनात नैतिकता जपतो—तोच खऱ्या अर्थाने हिंदू आहे. धर्माची ओळख घोषणांमध्ये नसून आचरणात आहे.

आपल्या पुढील पिढीला केवळ धार्मिक विधी नव्हे, तर प्रामाणिकपणा, विवेक, सहिष्णुता, पर्यावरणप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेचे संस्कार दिले, तर हिंदू धर्म अधिक सक्षम होईल. मंदिरांची संख्या वाढण्याइतकेच चांगल्या शाळा, ग्रंथालये, रुग्णालये, जलसंधारण, वृक्षलागवड आणि समाजसेवा वाढणेही आवश्यक आहे. कारण सेवा हीच सर्वोच्च साधना मानणारी परंपरा हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.

हिंदू होणे ही जन्माने मिळालेली ओळख असू शकते; पण खरा हिंदू म्हणून जगणे ही दररोज कृतीतून सिद्ध करावी लागणारी जबाबदारी आहे.

प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close