आलेसुर येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के
आलेसुर (ता. भिवापूर, जि. नागपूर) — श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ तसेच सर्व ग्रामवासी आलेसुर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ श्री तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच नागदिवाळी पर्वाच्या औचित्याने हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा दि. १७ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हनुमान व सामुदायिक प्रार्थना मंदिर, आलेसुर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा प्रारंभ शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी होणार असून रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७ वाजता भजन स्पर्धेला औपचारिक सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धेत शहरी, ग्रामीण, महिला व बाल गट अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक गटासाठी आकर्षक रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे ठेवण्यात आली आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून नामांकित खंजेरी भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.
या भजन स्पर्धेच्या माध्यमातून संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकास, श्रमप्रतिष्ठा, व्यसनमुक्ती व सामाजिक ऐक्याच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. भजन, कीर्तन व सामूहिक प्रार्थनेमुळे आलेसुर परिसर भक्तिमय वातावरणाने नटणार आहे.
स्पर्धा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी अनुभवी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून नियोजन, निवास व व्यवस्थेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभत असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
या राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ, आलेसुर व सर्व ग्रामवासी यांच्या वतीने करण्यात आले आहे.









